महाकुंभाच्या संगम परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत १० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. मौनी अमावस्येच्या निमित्ताने कोट्यवधी भाविक पवित्र स्नान करण्यासाठी आले होते. उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या नेमक्या संख्येबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. याच दरम्यान उत्तर प्रदेशातील एका मंत्र्याचं असंवेदनशील विधान आता समोर आलं आहे. अशा छोट्या मोठ्या घटना घडत राहतात असं त्यांनी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री संजय निषाद म्हणाले की, "भाविकांनी जिथे जागा असेल तिथे स्नान करावं. जिथे इतकी मोठी गर्दी असते, इतकं मोठं व्यवस्थापन असतं तिथे अशा छोट्या मोठ्या घटना घडत राहतात." या घटनेबाबत विरोधी पक्षनेते सतत यूपी सरकारच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
महाकुंभात 'जागतिक दर्जाच्या व्यवस्था' असल्याचा दावा करणाऱ्यांनी चेंगराचेंगरीची नैतिक जबाबदारी घ्यावी आणि आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली. जागतिक दर्जाच्या व्यवस्था करण्याच्या दाव्यांचे सत्य आता उघड झाले आहे, तेव्हा जे लोक याबद्दल दावा करत होते आणि खोटा प्रचार करत होते त्यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदांचा राजीनामा द्यावा असं म्हटलं आहे.
यूपी काँग्रेसचे अजय राय यांनी चेंगराचेंगरीबद्दल दुःख व्यक्त केलं आणि म्हणाले, "महाकुंभात मौनी अमावस्येच्या स्नानाच्या दिवशी चेंगराचेंगरीमुळे अनेक लोकांचा मृत्यू आणि जखमी झाल्याची बातमी दुःखद आहे. ही दुःखद घटना गैरव्यवस्थापनाचे परिणाम आहे. योगी सरकारने सर्व पैसे केवळ ब्रँडिंग आणि मार्केटिंगवर खर्च केले, महाकुंभात आलेल्या भाविकांच्या व्यवस्थेवर नाही. यावरून या सरकारची असंवेदनशीलता दिसून येते.