उत्तर प्रदेशातील गोंडा येथे एक भीषण अपघात झाला आहे, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. इटियाथोक पोलीस स्टेशन परिसरात अचानक एक बोलेरो कार कालव्यात पडली. या कारमध्ये एकूण १५ जण होते, त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात कसा झाला आणि त्यावेळी किती भयानक दृश्य होते हे अपघातातून वाचलेल्या लोकांनी सांगितलं आहे.
बोलेरोमध्ये असलेल्या एका मुलीने सांगितलं की, ते सर्वजण मंदिरात दर्शनासाठी जात होते, तेव्हा हा अपघात झाला.हा अपघात अचानक कसा झाला हे कोणाला कळलंच नाही. गाडीत सर्व जण बसले होते आणि अचानक ती पलटली, कोणालाही काहीही कळायच्या आत हा अपघात झाला. अपघातामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. सर्व काही संपलं असं सांगताना मुलगी ढसाढसा रडत होती.
बोलेरो कार नियंत्रणाबाहेर गेली आणि वेगाने कालव्यात पडली. काही लोकांचा बुडून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. बुडणाऱ्या लोकांनी गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो उघडलाच नाही, ज्यामुळे ते आत अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस हे अपघाताचे कारण असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या प्रशासन आणि बचाव पथकं घटनास्थळी उपस्थित आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं असून त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला जात आहे.
अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोस्ट करून आर्थिक मदतीची घोषणा केली. गोंडा जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातात झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबांसोबत संवेदना आहेत. या अपघातात मृतांच्या कुटुंबियांना ५-५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना तातडीने रुग्णालयात नेऊन योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत असं म्हटलं आहे.