उत्तर प्रदेशचे ऊर्जामंत्री एके शर्मा यांनी पुन्हा एकदा त्यांच्याच विभागातील अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. विभागातील निष्काळजीपण आणि असंवेदनशीलतेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर वीज विभागातील एक वरिष्ठ अधिकारी आणि ग्राहक यांच्यातील संभाषणाचं ऑडिओ रेकॉर्डिंग देखील शेअर केलं आहे.
एका वरिष्ठ नेत्याने त्यांना हा ऑडिओ पाठवला होता. विभागीय अधिकारी जनतेच्या तक्रारींकडे लक्ष देत नाहीत असा दावा करण्यात आला आहे. ऊर्जामंत्र्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, अनेक वेळा खासदार राहिलेल्या एका वरिष्ठ नेत्याने मला त्यांच्या भागातील एका सुशिक्षित नागरिक आणि वीज विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यामधील संभाषणाचा ऑडिओ पाठवला आहे आणि त्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अधिकाऱ्यांनी फोन उचलणं केलं बंद
ऊर्जामंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली आणि म्हणाले, अधिकाऱ्यांनी फोन उचलणं आता बंद केलं आहे. आम्ही वारंवार सांगूनही अशा चुकीच्या गोष्टी घडत आहेत.यामुळे जनता अडचणी येत आहे. शर्मा यांनी असा दावा केला की, बैठकीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची दिशाभूल केली. बैठकीत सर्वांनी सांगितलं की १९१२ (हेल्पलाइन) वरच तक्रारी नोंदवण्यासाठी कोणतेही विशेष निर्देश देण्यात आले नाहीत, परंतु मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. मी अनेक वेळा विचारलं, प्रत्येक वेळी मला खोटं ऐकायला मिळाले. आता तुम्ही स्वतः ऑडिओ ऐका आणि धक्कादायक वास्तव समजून घ्या.
"भयंकर परिणाम होतील..."
शर्मा यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, वीज विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेप्रती असलेली त्यांची जबाबदारी समजून घ्यावी. समस्या लवकर सोडवा, चांगलया भाषेत लोकांशी संवाद साधा. अन्यथा भयंकर परिणाम होतील. ऊर्जामंत्र्यांनी एका वरिष्ठ नेत्याने पाठवलेला व्हॉट्सअॅप मेसेजही शेअर केला आहे. ज्याची आता चर्चा रंगली आहे.
"माननीय मंत्री महोदय, बस्ती शहरातील एका मोठ्या परिसरात सकाळी १० वाजल्यापासून वीज नाही. रात्री ८ वाजेपर्यंत कोणताही अधिकारी फोन उचलत नव्हता. अधीक्षक अभियंत्यांना फोन केला तेव्हा त्यांचं वर्तन अतिशय असंवेदनशील होतं. त्यांचं बोलणे ऐकून तुम्हाला स्वतःला कळेल की, ते जनतेच्या तक्रारींप्रती किती असंवेदनशील आहेत आणि ते जाणूनबुजून सरकारची प्रतिमा खराब करत आहेत" असं मेसेजमध्ये म्हटलं आहे.