टिटवाळ्यात अनधिकृत नळ जोडण्यांचा सुळसुळाट, प्रशासनाचे दुर्लक्ष
By Admin | Updated: May 15, 2014 23:46 IST2014-05-15T21:38:03+5:302014-05-15T23:46:08+5:30
कल्याण डोंबिबली महानगर पालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रातील प्रभाग क्र .५, ६ व ७ मध्ये मोठ्याप्रमाणात अनधिकृत नळ जोडण्या राजरोसपणे होत असून पाणीपुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे़ .

टिटवाळ्यात अनधिकृत नळ जोडण्यांचा सुळसुळाट, प्रशासनाचे दुर्लक्ष
टिटवाळा- कल्याण डोंबिबली महानगर पालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रातील प्रभाग क्र .५, ६ व ७ मध्ये मोठ्याप्रमाणात अनधिकृत नळ जोडण्या राजरोसपणे होत असून पाणीपुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे़ आजमितीला या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळींचे व इमारतींचे काम सुरू आहे. या चाळींतील व इमारतीमधील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी ते काही खाजगी प्लंबर्सना हाताशी धरून मुख्यलाईनला होल करु न राजरोसपणे अनाधिकृत नळ जोडण्या घेत आहेत. तसेच काही बिल्डर्स देखील बांधकाम पूर्ण होण्या आधीच चोरून नळ जोडण्या घेत आहेत.
यामुळे अधिकृत नळजोडण्य धारकांना मुबलक पाणी पुरवठा होत नाही. या कारणास्तव पाणीपट्टी भरून देखील पुरेसा पाण्याचा पुरवठा होत नसल्याने पालिका प्रशासनाविरूध्द नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या अनाधिकृत नळ जोडण्यांमुळे जागोजागी लाईन लिकेज होऊन पाण्याचा अपव्यय तर होतच आहे, पन या ठिकाणी सांडपाणी साचून मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य देखील पसरले जाते. त्यामुळे या परीसरात मच्छ, डासांत प्रादुर्भाव होऊन नागरिकांना विविध अजारांना देखील सामोरे जावे लागत आहे. या बाबीकडे पालीका प्रशासनाच्या संबधीत विभागाने आपले लक्ष केंद्रीत करावे अशी मागणी केली जात आहे.
महापालिकेने काही महिन्यांपूर्वी अनधिकृत नळजोडणीधारकांवर कारवाई केली होती़ पुन्हा लवकरच मोठ्यास्वरूपात मोहीम उभारून कारवाई करण्यात येईल़- अनंत मादगुंडी, उपअभियंता, पाणीपुरवठा, विभाग, कल्याण-डोंबिवली महापालिका
(वार्ताहर)