विद्यार्थ्यांच्या जागेवर अनारक्षीत प्रवासी रेल्वेतील दांडगाई : वाराणसी-रत्नागिरी एक्सप्रेसचा खोळंबा
By Admin | Updated: December 16, 2015 23:49 IST2015-12-16T23:49:10+5:302015-12-16T23:49:10+5:30

विद्यार्थ्यांच्या जागेवर अनारक्षीत प्रवासी रेल्वेतील दांडगाई : वाराणसी-रत्नागिरी एक्सप्रेसचा खोळंबा
>जळगाव : कोकणच्या सहलीला जाणार्या काशीनाथ पलोड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षित जागेवर इतर प्रवासी बसल्याने जागेअभावी झालेल्या वादामुळे अप १२१६६ वाराणसी-रत्नागिरी एक्सप्रेस ही रेल्वेगाडी संतप्त पालकांनी बुधवारी जळगाव स्थानकावर रोखून धरली. त्यामुळे या गाडीचा येथे २८ मिनिटे खोळंबा झाला. या विद्यालयाच्या ७० विद्यार्थ्यांचे कोकणात सहलीसाठी अप १२१६६ वाराणसी-रत्नागिरी एक्सप्रेस या गाडीनेआरक्षण होते. असे असले तरी या गाडीत विद्यार्थ्यांच्या आरक्षित आसनांवर दुसरेच प्रवासी बसलेले होते. विद्यार्थ्यांना गाडीत चढण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. या मुळे पालक संतप्त झाले. विद्यार्थ्यांना गाडीत प्रवेशच करता येत नसल्याने पालकांनी साखळी ओढून गाडी थांबवली. तरीदेखील जागा बळकावून बसलेले अनारक्षीत प्रवासी हलायला तयार नसल्याने तब्बल चार वेळा साखळी खेचून गाडी थांबवली गेली. विद्यार्थी कसेबसे गाडीत चढले मात्र त्यांना बसायला जागा मिळालीच नाही. रेल्वे सुरक्षा बलाने गाडी अखेर तशीच रवाना केली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने मनमाड स्थानकावर संपर्क साधून तेथे विद्यार्थ्यांना जागा करून देणाच्या सूचना देण्यात आल्या. यामुळे गाडीला जळगाव स्टेशनवर २८ मिनिटे विलंब झाला.