संतापजनक....संयुक्त राष्ट्रासाठी हाफीज सईद म्हणजे 'साहेब'
By Admin | Updated: December 21, 2014 16:02 IST2014-12-21T16:02:42+5:302014-12-21T16:02:42+5:30
मुंबई हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईदला संयुक्त राष्ट्राने एक पत्रात चक्क 'साहेब' म्हटल्याचा प्रकार उघड झाला आहे.

संतापजनक....संयुक्त राष्ट्रासाठी हाफीज सईद म्हणजे 'साहेब'
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - मुंबई हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात उद दावाचा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईदला संयुक्त राष्ट्राने एक पत्रात चक्क 'साहेब' म्हटल्याचा प्रकार उघड झाला आहे. भारताने या पत्राला कडाडून विरोध दर्शवला असून संयुक्त राष्ट्राकडून भारताने स्पष्टीकरणही मागितले आहे.
१७ नोव्हेंबर रोजी भारताने संयुक्त राष्ट्राकडे हाफीज सईद आणि लष्कर ए तोयबाच्या कारवायांविरोधात तक्रार केली होती. भारताच्या तक्रारीवर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने नुकतेच उत्तर दिले आहे. परिषदेचे प्रमुख गॅरी क्वीनलेन यांची या पत्रावर स्वाक्षरीदेखील आहे. या पत्रात संयुक्त राष्ट्राने हाफीज सईदचा उल्लेख थेट 'साहेब' म्हणून उल्लेख केला आहे. सईद हा मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असून भारतविरोधी कृत्य करण्यात सईद नेहमीच आघाडीवर असतो. अशा दहशतवाद्याला संयुक्त राष्ट्राने साहेब म्हटल्याने भारताने तीव्र संताप व्यक्त केला आहे. विशेष बाब म्हणजे अमेरिका, युरोपमधील देशांनी सईदची माहिती देणा-यांना कोट्यावधीचे बक्षीस जाहीर केले असताना संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने असा प्रताप करणे निंदनीयच म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे. हाफीज सईदला साहेब म्हणून संयुक्त राष्ट्राने दहशतवादाविरोधात किती गंभीर आहोत हेदेखील दाखवून दिले अशा शब्दात अधिका-यांनी नाराजी दर्शवली.