बिहारमध्ये अनोखा धार्मिक सद्भाव
By Admin | Updated: August 28, 2014 02:27 IST2014-08-28T02:27:20+5:302014-08-28T02:27:20+5:30
बिहारमध्ये धार्मिक सद्भावनेचा अनोखा वस्तूपाठ घालून देत पुरोहिताने हज यात्रेकरूंना आश्रमात राहण्याचा तर मौलानांनी पिंडदानासाठी येणाऱ्यांना मदरशांची दारे खुली करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

बिहारमध्ये अनोखा धार्मिक सद्भाव
गया : बिहारमध्ये धार्मिक सद्भावनेचा अनोखा वस्तूपाठ घालून देत पुरोहिताने हज यात्रेकरूंना आश्रमात राहण्याचा तर मौलानांनी पिंडदानासाठी येणाऱ्यांना मदरशांची दारे खुली करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
जगप्रसिद्ध विष्णुपद मंदिराचे ख्यातनाम पुरोहित स्वामी राघवाचार्य यांनी राज्यातील हज यात्रेकरूंना आपल्या आश्रमात नि:शुल्क आदरातिथ्य देऊ केले आहे. त्याला तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद देत जिल्ह्यातील मदरशा असोसिएशनचे प्रमुख मौलाना उमर नुरानी यांनी पिंडदान आणि पित्रदोष निवारण विधीसाठी गया येथे येणाऱ्यांना मदरशाची दारे खुली करण्याचे जाहीर केले.
गया प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी एक विशेष बैठक आयोजित केली होती, त्यावेळी पुरोहित व मौलानांनी हे प्रस्ताव ठेवले.
स्वामींनी हज यात्रेकरूंना केवळ रात्री मुक्कामाचा प्रस्ताव दिला नाही तर त्यांच्यासाठी आश्रमातील स्वयंपाक खोली खुली केली. ज्यांना आश्रमात शिजलेले अन्न नको असेल, त्यांना अन्नधान्य, गॅस, स्टोव्ह आणि सिलिंडर देण्यात येईल, असेही राघवाचार्य म्हणाले. बिहारमधील ही घडामोड राष्ट्रीय एकात्मता दर्शविणारी असून अनेक स्तरातून या भूमिकेचे स्वागत करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)