राज्यातील केंद्रीय मंत्र्यांना मुंबई दूरच
By Admin | Updated: September 23, 2014 04:30 IST2014-09-23T04:30:31+5:302014-09-23T04:30:31+5:30
युती होईल की तुटेल या प्रश्नांच्या जंजाळात राज्यच नव्हे तर केंद्राचे राजकारणही अडकले असताना, केंद्रात असलेल्या महाराष्ट्रातील मंत्री या वातावरणापासून चार हात लांबच

राज्यातील केंद्रीय मंत्र्यांना मुंबई दूरच
रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
युती होईल की तुटेल या प्रश्नांच्या जंजाळात राज्यच नव्हे तर केंद्राचे राजकारणही अडकले असताना, केंद्रात असलेल्या महाराष्ट्रातील मंत्री या वातावरणापासून चार हात लांबच आहेत. सध्या मंत्रालयातच थांबा, १ आॅक्टोबरनंतरच जबाबदारी दिली जाईल, असे सांगण्यात आल्याचे सूत्राने सांगितले.
विशेष म्हणजे, जागा वाटपाच्याच नव्हे, तर युती टिकवण्यासाठी पक्ष ‘दंडबैठका’ काढत असताना, महत्त्वाच्या समित्यांवर असलेले नितीन गडकरी वगळता अन्य तीन मंत्र्यांना राज्यातील कोणत्याही विषयात सहभागीही करून घेण्यात आलेले नाही.
निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर केंद्रातील मंत्र्यांना राज्यात पाठविण्याची योजना केंद्र सरकारची होती. तशी चाचपणी करून मागील दोन महिने काही मंत्री राज्यात पाठविण्यातही आले होते. पण प्रत्यक्षात निवडणुकीच्या तोंडावर गडकरी वगळता, केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे यांना अजून एकही जबाबदारी सोपविण्यात आलेली नसल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. शिवसेना-भाजपाचा तिढा सुटत नसल्याने केंद्रीय मंत्री किती काळजीत असतील याचा धांडोळा घेतला तेव्हा दिसून आले, की पक्षाने त्यांना हस्तक्षेप करू नका, कोणतेही विधान करू नका, कोणतीही जबाबदारी घेऊ नका, कोणाचीच शिफारस करू नका या चतुसूत्रीवर कायम राहण्याची सूचना केली. त्यामुळे माहिती प्रसारणमंत्री जावडेकर अमेरिकेत एका परिषदेसाठी गेले आहेत. ते २५ला पहाटे भारतात परततील. सार्वजनिक अन्न वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे चार दिवसांपासून जालना, लातूर व भोकरदन भागात फिरत आहेत. भोकरदनमधून त्यांचे चिरंजीव संतोष यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी पक्षाकडे प्रयत्न केले, ते फळास येत असल्याने ते दोन दिवसांच्या भोकरदन दौऱ्यावर गेले. ऊर्जा व कोळसा राज्यमंत्री पीयूष गोयल हे मोदी यांच्या मर्जीतील मानले जातात. पक्षाचे कोषाध्यक्ष होते. ते मूळचे मुंबईचे असल्याने दोन दिवस मुंबईस जाऊन आले खरे, पण सध्या दिल्लीतच आहेत. आज दिवसभर त्यांनी कार्यालयातच घालविला. कोणत्याही प्रकारचे राजकीय भाष्य त्यांना करायचे नाही. ११, अशोक रोड या भाजपाच्या केद्रीय कार्यालयात राज्याच्या निवडणुकीबाबत कमालीची उत्सुकता आहे; आणि युती होत नसल्याने काळजीही व्यक्त होते. सध्या तरी येथे वादळापूर्वीची शांतता आहे.