Kiren Rijiju on Rahul Gandhi: केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी राहुल गांधी यांच्या चौकीदार चोर या वक्तव्याबद्दल सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारल्याचा आणि भारत-चीन सीमा तणावावरील त्यांच्या टिप्पण्यांचा संदर्भ दिला. राहुल गांधी यांनी भारतीयांसारखे बोलावे, पण ते कोणाचेही ऐकत नाहीत, अगदी त्यांच्या पक्षाच्या लोकांचेही नाही, असं मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं. तसेच जेव्हा राहुल गांधी संसदेत बोलतात तेव्हा त्यांच्याच पक्षाचे खासदार अस्वस्थ होतात, असंही मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींवर भारतविरोधी शक्तींशी हातमिळवणी करून देश कमकुवत करत असल्याचा आरोप केला. निवडणुका हरल्यानंतर काँग्रेस संस्थांची बदनामी करते, असं रिजिजू म्हणाले. पंतप्रधान-मुख्यमंत्री अटक करण्याच्या विधेयकावर पंतप्रधान मोदींच्या भूमिकेसाठी आणि संसद रखडल्याबद्दल त्यांनी विरोधकांना जबाबदार धरले. कोणत्याही निवडणुकीत लोक राष्ट्रहितासाठी काम करणाऱ्यांना पाठिंबा देतात. राहुल गांधी हेडलाइन मिळवण्यासाठी विचित्र गोष्टी बोलतात. पण त्यांच्या या गोष्टी मतात बदलणार नाहीत. जर मी त्यांच्या जागी असतो तर मी सरकारला राष्ट्रीय हिताचे प्रश्न विचारले असते असं किरेन रिजिजू यांनी म्हटलं.
"राहुल गांधी हे विरोधीपक्षाचे नेते आहेत आणि मला त्यांच्यावर टीका करायची नाही. पण जेव्हा त्यांनी पंतप्रधानांना 'चोर' म्हटले, राफेलबाबत निरर्थक भाष्य केलं आणि चीनने आमची जमीन बळकावली असा दावा केला तेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारले. त्यांनी भारतीयांसारखे बोलले पाहिजे. मी राहुल गांधींमध्ये सुधारणा करणारा नाही. कारण ते ऐकणारे नाहीत. जेव्हा जेव्हा राहुल गांधी काही बोलतात तेव्हा त्यांचे सर्व खासदार खूप अस्वस्थ होतात. त्यांना भीती असते की ते निरर्थक बोलतील आणि पक्षाला त्याची किंमत मोजावी लागेल. लोकशाहीत, विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे. ते विरोधी पक्षाची मूलभूत कर्तव्ये पार पाडू शकत नाहीत, एक मजबूत विरोधी पक्ष तर सोडाच," असं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.
"राहुल गांधी अतिशय धोकादायक मार्गाने जात आहेत. जॉर्ज सोरोस यांनी भारत सरकार अस्थिर करण्यासाठी एक ट्रिलियन डॉलर्स ठेवले आहेत. कॅनडा, अमेरिका, ब्रिटन आणि अनेक डाव्या संघटनांशी संबंधित खलिस्तानी शक्ती भारताविरुद्ध कट रचत आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेस त्यांच्यासोबत उभे आहेत. हे खूप चिंताजनक आहे, पण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली कोणीही देश अस्थिर करू शकत नाही," असंही रिजिजू म्हणाले.