चाचा चौधरी कार्टूनचा 'प्राण' हरपला
By Admin | Updated: August 6, 2014 12:17 IST2014-08-06T11:52:47+5:302014-08-06T12:17:31+5:30
चाचा चौधरी आणि साबू या कार्टून कॅरेक्टरद्वारे बच्चेकंपनींना खदखदून हसवणारे व्यंगचित्रकार प्राण यांचे बुधवारी सकाळी निधन झाले.

चाचा चौधरी कार्टूनचा 'प्राण' हरपला
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ६ - चाचा चौधरी आणि साबू या कार्टून कॅरेक्टरद्वारे बच्चेकंपनींना खदखदून हसवणारे व्यंगचित्रकार प्राण यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. गुडगावमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७५ वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे कॉमिक पर्वातील प्राण गेला अशी भावना व्यक्त होत आहे.
१९३८ मध्ये लाहोर येथे प्राण यांचा जन्म झाला. प्राणकुमार शर्मा असे त्यांचे मूळ नाव होते. १९६० मध्ये दिल्लीतील मिलाप या वृत्तपत्रातून त्यांनी कार्टूनिस्ट म्हणून सुरुवात केली. या वृत्तपत्रातील डब्बू हे कार्टून दिल्लीकरांना भावले. यानंतर १९६९ मध्ये प्राण यांनी लोटपोट या हिंदी मासिकामध्ये चाचा चौधरींचे कार्टून रेखाटले आणि अवघ्या काही महिन्यांमध्येच हे कार्टून लोकप्रिय झाले. चाचा चौधरी व साबू हे कॅरेक्टर आबालवृद्धांसह सर्वांनाच आपलेसे वाटते हीच प्राण यांच्या कामाची पोचपावती होती. यानंतरही प्राण यांनी श्रीमतीजी, पिंकी, बिल्लो, रमन आणि छन्नी चाची हे कार्टून कॅरेक्टरही रेखाटले आहेत.
गेल्या आठ महिन्यांपासून प्राण यांना कर्करोगाने ग्रासले होते. यासाठी त्यांना गुडगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी नऊ वाजता प्राण यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा आणि मुलगी अशा परिवार आहे. प्राणकुमार शर्मा यांची आठवण सांगताना डायमंड कॉमिक्सचे गुलशन राय म्हणाले, प्राण यांच्याकडे कौटुंबिक पात्र रेखाटण्यासाठी अफलातून विनोदबुद्धी होती. साधेपणा हे त्यांचे स्वभाववैशिष्ट्य होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे प्राण यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. कार्टूनच्या माध्यमातून प्राण यांनी अनेकांच्या चेह-यावर हसू आणले अशी भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केली.