उद्धव ठाकरे मोदींना भेटणार
By Admin | Updated: October 21, 2014 18:59 IST2014-10-21T18:10:06+5:302014-10-21T18:59:59+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या दोन ते चार दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतील आणि शिवसेना व भाजपा यांच्यातील वितुष्ट संपवण्यात येईल अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे मोदींना भेटणार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - शिवसेना व भारतीय जनता पार्टी सत्तास्थापनेसाठी एकत्र येतील अशी चिन्हे असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या दोन ते चार दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतील आणि शिवसेना व भाजपा यांच्यातील वितुष्ट संपवण्यात येईल अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. निकालांनंतर उद्धव यांनी मोदींना व अमित शहांना फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या हे लक्षात घेता, उद्धव ठाकरे सत्तेत सहभागी होण्यासंदर्भातील चर्चा राज्य पातळीवरील नेत्यांशी न करता देशपातळीवरील नेत्यांशी करतील अशी शक्यता दिसत आहे.
मोदी हे काश्मिरच्या दौ-यावर जाणार असल्याने, या दौ-याआधी वा नंतर ठाकरे दिल्लीत जातील अशी शक्यता आहे. दिवाळीनंतर महाराष्ट्रात सरकार स्थापण्यात येणार असल्याने या चर्चेसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. तसेच, दिवाळी संपल्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी नवा मुख्यमंत्री शपथग्रहण करेल अशी शक्यता आहे. त्यादृष्टीने बीकेसी मैदान तसेच वानखेडे स्टेडियम अशा दोन ठिकाणांची चर्चा सुरू आहे.
नितिन गडकरी बनणार मुख्यमंत्री?
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असले तरी सुधीर मुनगंटीवार यांनी नितिन गडकरी यांचे नाव पुढे करून भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदावरून धुसफूस होण्याची शक्यता दिसत आहे. तसेच, अमित शहा यांनी नितिन गडकरी यांच्याशी दोन तास केलेली चर्चा विचारात घेता नितिन गडकरी नाही म्हणत असले तरी ते मुख्यमंत्री होऊ शकतात असे संकेत पक्षातून मिळत आहेत.
गडकरींच्या निवासस्थानाबाहेर आमदारांचे शक्तीपदर्शन
नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री करण्यात यावे या मागणीसाठी ४० आमदारांनी गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर शक्तीपदर्शन केले. ४० भाजपा आमदार गडकरी यांच्या भेटीला आले असून गडकरी यांनीच मुख्यमंत्रीपद भूषवावे अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना ४० आमदारांनी मुख्यमंत्री होण्यास विरोध दर्शवला आहे.