Uddhav Thackeray on Saugat-e-Modi: केंद्रातील भाजप सरकारने अल्पसंख्याकांच्या मदतीसाठी 'सौगत-ए-मोदी' नावाने एक नवीन मोहीम सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत भाजपचे कार्यकर्ते देशभरातील मुस्लिम समुदायातील लोकांमध्ये जाऊन त्यांना 'सौगत-ए-मोदी' किट देतील. ईदीच्या निमित्ताने या किटचे वाटप केले जाईल. सौगात-ए-मोदींचे सर्वात मोठे लक्ष बिहार विधानसभा निवडणुकांवर आहे. मात्र यावरुनच उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने आता हिंदुत्व सोडून टाकल्याची घोषणा करावी असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"शिवसेनेला मुस्लीम समाजाने मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. मुस्लीम समाज शिवसेनेवर विश्वास ठेवून आमच्यासोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते. त्यांनी लगेच म्हटलं की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. आता मला एका गोष्टीचे समाधान आहे की इथे जे बोंबलत फिरत होते त्यांना पाचर बसली आहे. कारण ईदच्या निमित्ताने सौगात ए मोदी हा कार्यक्रम भाजपने हाती घेतला आहे. ३५ लाख मुस्लीम कुटुंबियांच्या घरी जाऊन भाजप कार्यकर्ते त्यांना सौगात ए मोदी देणार आहेत. हे सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता आहे. सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात त्याचे हे एक उदाहरण आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा देणारे आता भेट द्यायला चालले आहेत. आयुष्यभर मुस्लीम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यावर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे. याच्यात एक गोष्ट चांगली आहे. आमच्याकडचे जे काही उडाणटप्पू आहेत ते टोपी घालून कशी सौगात घेऊन जातात ते मला बघायचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"अधिवेशनाने देशाला उत्तम गाणं दिलं मान्य करावं लागेल"; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
"मला चिंता एकाच गोष्टीची आहे. पंतप्रधान मोदी लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते की मंगळसूत्र चोरलं जाणार. पण आता हिंदुंच्या मंगळसुत्राचे रक्षण कोण करणार? कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष? हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे की निवडणुकीपूरती? सौगात ए सत्ता ही बिहारच्या निवडणुकीपूरती राहणार आहे की नंतरही राहणार आहे हे भाजपने जाहीर करावं," असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.
"भाजपने आता घोषणा करायला हवी की त्यांनी हिंदुत्व सोडून टाकलं. इतके वर्षे त्यांनी हिंदू मुस्लीमांमध्ये भांडणे लावली. काही जणांच्या घरावर बुलडोझर चालवले. त्यांच्या घरी सौगात घेऊन कोण जाणार हे सुद्धा त्यांनी जाहीर करावं," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.