हवाई टॅक्सी विकसित करण्यासाठी उबेरची नासासोबत भागीदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 03:50 IST2017-11-10T03:49:44+5:302017-11-10T03:50:25+5:30
हवाई टॅक्सी (फ्लाइंग टॅक्सी) विकसित करण्याच्या प्रकल्पात उबेरने अमेरिकी आंतराळ संस्था नासाशी भागीदारी केली आहे.

हवाई टॅक्सी विकसित करण्यासाठी उबेरची नासासोबत भागीदारी
लॉस एंजेलिस : हवाई टॅक्सी (फ्लाइंग टॅक्सी) विकसित करण्याच्या प्रकल्पात उबेरने अमेरिकी आंतराळ संस्था नासाशी भागीदारी केली आहे. उत्तम दर्जा आणि कमी किंमत हे निकष नजरेसमोर ठेवून ही टॅक्सी विकसित करण्यात येणार आहे.
उबेरने जारी केलेल्या माहितीनुसार, यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘उबेरएअर’ प्रकल्पात लॉस एंजेलिस शहराचा समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील डलास फोर्थ-विथ आणि दुबई यांचा या प्रकल्पात आधीच समावेश झालेला आहे. कॅलिफोर्निया आणि टेक्सास हे अमेरिकेतील सर्वाधिक कार असलेले प्रांत आहेत.
उबेरच्या निवेदनात म्हटले आहे की, नासाच्या मानवरहित वाहतूक व्यवस्थापन (यूटीएम) प्रकल्पात उबेर सहभागी झाली आहे. अमेरिकेच्या निवडक शहरात २०२० पर्यंत प्रदर्शनी हवाई टॅक्सी सुरू करण्याचे लक्ष्य ‘उबेरएअर’ने ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी नासासोबतची भागीदारी लाभदायक ठरेल. नासासोबतच्या भागीदारीतून आणखीही काही संधी शोधण्याची उबेरची इच्छा आहे. त्यातून नागरी हवाई वाहतुकीची नवी बाजारपेठ निर्माण होईल.
उबेरच्या योजनेनुसार, हवाई टॅक्सी सेवेचे पहिले प्रात्यक्षिक २०२० मध्ये घेतले जाईल. २०२३ पर्यंत ही सेवा व्यावसायिक पातळीवर सुरू होईल. २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे आॅलिम्पिक खेळ होणार आहेत. त्याआधीच ही सेवा पूर्णत: सुरू झालेली असेल. त्यासाठी भरपूर वेळही कंपनीकडे आहे.
उबेरचे प्रवक्ते मॅथ्यू विंग यांनी सांगितले की, सुरुवातीच्या काळात हवाई टॅक्सीमध्ये पायलट असेल. नंतर मात्र ही सेवा पूर्णत: स्वयंचलित असेल. लॉल एंजेलिस विमानतळ आणि स्टेपल्स सेंटर संकुल या मार्गावरील प्रवास हवाई टॅक्सी २७ मिनिटांत पूर्ण करील. कार प्रवासाच्या तुलनेत हा वेळ तिपटीने कमी आहे.
सध्याच्या उबेर कार टॅक्सी ज्याप्रमाणे अॅपच्या माध्यमातून बुक करण्यात येतात, तशाच हवाई टॅक्सीही बुक करता येतील.
उबेरने म्हटले की, प्रस्तावित हवाई टॅक्सी इलेक्ट्रिक वाहन असेल. त्याचे उड्डाण (टेक-आॅफ) आणि जमिनीवरील अवतरण (लँडिंग) हेलिकॉप्टरसारखे व्हर्टिकल पद्धतीचे असेल.
म्हणजेच त्याला विमानासारखे लांबवर धावण्याची गरज भासणार नाही. हे वाहन हेलिकॉप्टरपेक्षा मात्र पूर्णत: भिन्न असेल.
ते अधिक सुरक्षित असेल, लवकर उंची पकडणारे आणि परवडणारेही असेल. सामान्य टॅक्सीच्या दरात ही सेवा देण्याची कंपनीची योजना आहे.