काश्मिरात दोन अतिरेकी हल्ले

By Admin | Updated: May 26, 2015 01:37 IST2015-05-26T01:37:12+5:302015-05-26T01:37:12+5:30

काश्मिरात सोमवारी अतिरेक्यांनी लष्कराच्या एका गस्ती दलासह बीएसएनएलच्या एका ‘फ्रँचाईजी’ला लक्ष्य केले. या हल्ल्यात एका जवानासह तिघे मृत्युमुखी पडले, तर अन्य दोघे जखमी झाले.

Two terror attacks in Kashmir | काश्मिरात दोन अतिरेकी हल्ले

काश्मिरात दोन अतिरेकी हल्ले

श्रीनगर : काश्मिरात सोमवारी अतिरेक्यांनी लष्कराच्या एका गस्ती दलासह बीएसएनएलच्या एका ‘फ्रँचाईजी’ला लक्ष्य केले. या हल्ल्यात एका जवानासह तिघे मृत्युमुखी पडले, तर अन्य दोघे जखमी झाले. ठार झालेल्यांमध्ये एका अतिरेक्याचा समावेश आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, येथून सुमारे ८० कि. मी. दूर दक्षिण काश्मिरातील कुलगाम जिल्ह्याच्या कांजीकुला येथे लष्कराच्या एका गस्तीवर असलेल्या पथकावर अतिरेक्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात लष्करी जवान धरम राम जखमी झाला. उपचारादरम्यान त्याने प्राण सोडला. यानंतर उडालेल्या चकमकीत एका अतिरेक्यास यमसदनी पाठविण्यात सुरक्षा दलाला यश आले.
तत्पूर्वी अतिरेक्यांनी येथून ५२ कि. मी. दूर उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्याच्या सोपोर येथे बीएसएनएलच्या एका ‘फ्रँचाईजी आऊटलेट’वर गोळीबार केला. दूरसंचार आॅपरेटरला लक्ष्य करून करण्यात आलेल्या या गोळीबारात फ्रँचाईजीतील तीन कर्मचारी जखमी झाले. यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहंमद रफिक असे त्याचे नाव आहे. सोपोर भागात गत ४८ तासांतील हा अशा प्रकारचा दुसरा हल्ला आहे. २३ व २४ मे रोजीच्या मध्यरात्री संशयित अतिरेक्यांनी एका रहिवासी भागात ग्रेनेड डागले होते. या परिसरात मोबाईल ट्रान्समिशन टॉवर लागलेले होते.

1 अतिरेकी दूरसंचारशी संबंधित ठिकाणांना का लक्ष्य करीत आहेत, याबाबत अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत. तथापि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपोर आणि आजूबाजूच्या भागातील मोबाईल ट्रान्समिशन टॉवर्सवर त्यांनी लावलेली संचार उपकरणे ‘चोरी’ गेल्यामुळे अतिरेकी संतापले आहेत.
2 अतिरेक्यांनी खासगी आणि सरकारी कंपन्यांच्या टॉवर्सच्या टोकाला कथितरीत्या स्वत:ची संचार उपकरणे लावलेली होती.

घुसखोरी हाणून पाडताना तीन जवान शहीद
४श्रीनगर : सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सोमवारी नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला; मात्र तीन जवान शहीद झाले. एक अतिरेकी मारला गेला असून अतिरेक्यांच्या एका गटाला पिटाळून लावण्यात जवानांना यश आल्याची माहिती लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिली.
४तंगधर नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर जवानांनी अतिरेक्यांच्या दिशेने गोळीबार केला. दोन्हीकडून धुमश्चक्री सुरू असताना तीन जवानांनी प्राणाची बाजी लावली. जवानांनी एका अतिरेक्याला कंठस्नान घातले. गंभीर जखमी चार जवानांपैकी तिघांचा उपचाराआधीच मृत्यू झाला.

नक्षलवाद्यांचा पुन्हा उच्छाद; बिहारमध्ये ३२ वाहने जाळली
गया : माओवाद्यांनी आपल्या दोनदिवसीय बिहार आणि झारखंड बंदच्या पहिल्या दिवशी व्यापक हिंसाचार घडवीत गया जिल्ह्यातील ग्रँड ट्रंक रोडवर टँकर्स आणि कंटेनरसह एकूण ३२ वाहने जाळली.
सशस्त्र माओवाद्यांच्या या हिंसाचारात सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. कोलकाता आणि दिल्लीला जोडणाऱ्या महामार्गावर सोमवारी पहाटे ही जाळपोळ करण्यात आली. जवळपास ५० सशस्त्र माओवाद्यांच्या टोळीने बिशूनपूर आणि ताराडिह या गावांजवळ जीटी रोडवर ३२ वाहनांना आग लावली, अशी माहिती पाटणा परिमंडळाचे पोलीस महानिरीक्षक कुंदन कृष्णन यांनी दिली.
जाळण्यात आलेल्या वाहनांत एलपीजी सिलिंडर भरलेले चार टँकर्स व एका डिझेल टँकरचा समावेश आहे. माओवाद्यांनी एक कारही पेटविली. आग लावण्याआधी कारमधील कुटुंबाला सुखरूप बाहेर पडण्यास सांगितले.
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत सारण जिल्ह्याच्या पानापूर येथे माओवाद्यांनी एक मोबाईल टॉवरही उडविल्याचे वृत्त आहे. (वृत्तसंस्था)

४सीआरपीएफसोबत गेल्या १६ मे रोजी उडालेल्या सशस्त्र चकमकीत बिहार-झारखंड-छत्तीसगड विशेष क्षेत्रीय कमिटीची सदस्य सरिता ऊर्फ ऊर्मिला गांजू ही माओवादी ठार झाली होती. तिच्या हत्येच्या विरोधात या दोन दिवसांच्या बंदचे आयोजन केले आहे.

Web Title: Two terror attacks in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.