कुपवाडयाच्या चकमकीत महाराष्ट्र आणि कर्नाटकचे दोन जवान शहीद
By Admin | Updated: February 14, 2016 14:00 IST2016-02-14T11:31:43+5:302016-02-14T14:00:52+5:30
सुरक्षा दलाच्या जवानांनी अतिरेक्यांविरुध्दची मोहिम यशस्वी करत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र या चकमकीत अतुलनीय शौर्य दाखवताना दोन वीर शहीद झाले.

कुपवाडयाच्या चकमकीत महाराष्ट्र आणि कर्नाटकचे दोन जवान शहीद
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १४ - जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी अतिरेक्यांविरुध्दची मोहिम यशस्वी करत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र या चकमकीत अतुलनीय शौर्य दाखवताना महाराष्ट्र आणि कर्नाटकचे दोन वीर शहीद झाले.
नाशिकच्या चांदवडचा शंकर शिंदे आणि कर्नाटकातील विजापूरचा सहदेव मारुती मोरे हे दोन शूर जवान शहीद झाले. उत्तर काश्मीरमधील कूपवाडा जिल्ह्यात चौकीबल भागातील मरसारी गावात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती शुक्रवारी सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली असता त्यांनी राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलिस दल व राज्य पोलिसांच्या विशेष कृती गटाच्या सहाय्याने संयुक्तरित्या शोधमोहिम हाती घेतली.
बर्फाच्छादीत भागात एका घरात हे दहशतवादी लपून बसले होते. दहशतवाद्यांना पळता येऊ नये यासाठी दहशतवादी लपून बसलेल्या घराला पोलिसांनी वेढा देताच दहशतवाद्यांनी अंदाधुद गोळीबार सुरू केला, जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
मात्र या घटनेत दोन जवान शहीद आणि ५ जण जखमी झाले. बराच वेळ सुरू असलेल्या या चकमकीत जवानांनी काल ४ दहशतवाद्यांना अखेर कंठस्नान घातले तर आज दुपारी पाचवा दहशतवादी ठार झाला.