ईश्वर्या रामनाथन आणि सुष्मिता रामनाथन या दोन बहिणींनी कमाल केली आहे. गरिबीला आव्हान देत, परिस्थितीवर मात करत यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या दोन्ही बहिणींचा संघर्ष सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. आपल्या स्वप्नांना मागे टाकू नका आणि कठोर परिश्रम करा. आपल्याला नक्कीच यश मिळेल हे त्यांनी दाखवून दिलं आहे.
त्सुनामीमध्ये बेघर झाल्या
तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात ईश्वर्या आणि सुष्मिता वाढल्या. त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. २००४ मध्ये हिंदी महासागरातील त्सुनामी दरम्यान त्यांना आपलं घर गमवावं लागलं. त्या बेघर झाल्या. कुटुंबाला खूप दुःख सहन करावं लागलं, पण ही भयानक आपत्ती या दोन्ही बहिणींच्या स्वप्नांना तोडू शकली नाही.
IAS ईश्वर्या रामनाथन
सर्वप्रथम धाकटी बहीण ईश्वर्या रामनाथनने यूपीएससीमध्ये यश मिळवलं. २०१८ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत तिने ऑल इंडिया ६२८ वा रँक मिळवला, त्यानंतर तिची रेल्वे अकाउंट्स सर्व्हिस (आरएएस) साठी निवड झाली.पण ती तिच्या रँकवर समाधानी नव्हती, म्हणून तिने २०१९ मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि यावेळी ती केवळ २२ व्या वर्षी ४४ व्या रँकसह आयएएस अधिकारी बनली. तिला तामिळनाडू कॅडर मिळालं आहे.
IPS सुष्मिता रामनाथन
धाकट्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून, सुष्मितानेही UPSC साठी चांगली तयारी केली, परंतु तिची तयारी पुरेशी नव्हती, म्हणून ती तिच्या पहिल्या पाच प्रयत्नांमध्ये अपयशी ठरली. मात्र हार मानली नाही आणि २०२२ मध्ये पुन्हा परीक्षेला बसली. यावेळी त्याने ५२८ व्या रँकने परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिची आयपीएससाठी निवड झाली.