काश्मीरमध्ये दोन मतदानकेंद्रे पेटवली
By Admin | Updated: April 11, 2017 00:14 IST2017-04-11T00:14:17+5:302017-04-11T00:14:17+5:30
काश्मीरात पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार उसळला असून अनंतनाग जिल्ह्यात बुधवारी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या दोन दिवस अगोदर जमावाने

काश्मीरमध्ये दोन मतदानकेंद्रे पेटवली
श्रीनगर : काश्मीरात पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार उसळला असून अनंतनाग जिल्ह्यात बुधवारी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या दोन दिवस अगोदर जमावाने येथील मतदान केंद्र असलेल्या दोन शाळांना आग लावली. त्यामुळे येथील निवडणूकच स्थगित करण्याची मागणी पीडीपीच्या उमेदवाराने केली आहे. दरम्यान, बडगाम आणि गंदरबल जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलविलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पीडीपीचे उमेदवार तसदुक मुफ्ती म्हणाले की, परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत येथील निवडणूक स्थगित करण्याची मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे करत आहोत.
निवडणूक रद्द करण्याची मागणी करणे म्हणजे मुख्यमंत्री महेबूबा मुफ्ती यांच्या सरकारवरच आरोप करण्यासारखे आहे, असे मत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे.
उमर यांनी व्टिट केले आहे की, हा तर सरकारच्या अपयशावरच
आरोप आहे. भाजप हे पाहू शकत नाही का? (वृत्तसंस्था)
घुसखोरी उधळली
कुपवाडा जिल्ह्याच्या केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा अतिरेक्यांचा प्रयत्न उधळून लावत सैन्याने चार अतिरेक्यांना ठार केले. सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, अतिरेक्यांच्या समूहाने केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.
पण, सुरक्षा दलाने हा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात चार अतिरेकी मारले गेले.
या परिसरात शोध मोहिम सुरु आहे.
जमाव पांगविण्यास
काश्मीरातील जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दल गुप्त शस्त्रावर सद्या काम करत आहे, अशी माहिती अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. पॅलेट गनच्या वापराचा बचाव करताना त्यांनी ही माहिती दिली. यापूर्वीचे काही उपाय जमावाला पांगविण्यासाठी उपयोगी पडले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पॅलेट गनच्या ऐवजी रबराच्या गोळ्यांचीही चाचपणी करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.