उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला केवळ एक दिवस शिल्लक असतानाच, देशातील दोन मोठ्या पक्षांनी या निवडणुकीपासून दूर राहण्याचा अथवा तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. एक म्हणजे, नवीन पटनायक यांचा बीजू जनता दल (BJD), तर दुसरा म्हणजे, के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारत राष्ट्र समिति (BRS). महत्वाचे म्हणजे, राष्ट्रीय पातळीवर हे दोन्ही पक्ष सत्ताधारी NDA आणि विरोधकांच्या I.N.D.I.A. चा भाग नाहीत.
बीजू जनता दलाची घोषणा -पक्षप्रमुख नवीन पटनायक दिल्लीत पोहोचल्यानंतर, बीजदने या निर्णयासंदर्भात माहिती दिली. खरे तर, या निवडणुकीपासून बीजू जनतादल दूर राहिल, असा अंदाज आधापासूनच लावला जात होता. महत्वाचे म्हणजे, आपण सत्ताधआरी NDA आणि विरोधकांच्या I.N.D.I.A. पासूनही दूरच राहणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे.
काय असू शकतं कारण?बीजू जनतादलाच्या या निर्णयामागचे कारण म्हणजे, तटस्थ राहण्याची रणनीती मानले जात आहे. असे मानले जाते की, त्यांना एनडीएला नाराजही करायचे नाही आणि त्यांच्या बाजूनेही उभे रहायचे नाही. महत्वाचे म्हणजे, राष्ट्रीय राजकारणात, नवीन पटनायक यांचा हा पक्ष, अनेक वेळा सत्ताधारी पक्षासोबत राहिला आहे अथवा तटस्थ तरी राहिला आहे. गेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बीजेडीने एनडीएच्या उमेदवाराला मतदान केले होते.
यासंदर्भात बोलताना बीजद खासदार सास्मित पात्रा म्हणाले, 'बीजू जनता दलाने उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. बीजू जनता दल NDA आणि INDIA या दोघांपासूनही दूर राहील. आपमेच लक्ष्य ओडिशाचा विकास, कल्याण आणि ओडिशातील 4.5 कोटी लोक आहेत.'
गेल्या काही वर्षांत अशा निवडणुकांमध्ये बीजेडीने राष्ट्रीय पातळीवर भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, राज्यातील सत्ता गमावल्यानंतर ते संकटात सापडले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून पराभव झाल्यानंतर, बीजेडी आता राज्यातील मुख्य विरोधी पक्ष आहे.
बीआरएसचा निर्णय - यासंदर्भात बोलताना, बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामा राव सोमवारी म्हणाले, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय म्हणजे, राज्यातील युरियाच्या कमतरतेसंदर्भात तेलंगणातील शेतकऱ्यांच्या वेदनेची अभिव्यक्ती आहे. यावेळीत्यांनी, युरियाचा प्रश्न सोडवण्यात भाजप आणि काँग्रेस दोघेही अपयशी ठरल्याचा आरोपही केला. युरियाचा तुटवडा एवढा गंभीर आहे की, रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांमध्ये हाणामारी होत आहे, असेही केटीआर म्हणाले. एवढेच नाही तर, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नोटा पर्याय उपलब्ध असता, तर बीआरएस त्याचा वापर करू शकली असती, असेही ते म्हणाले.