केरळच्या तलिपरम्बा येथे अजगराची मारून त्याचे मांस शिजवल्याच्या आरोपाखाली दोन जणांना अटक करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकाऱ्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेची माहिती मिळताच प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.
प्रमोद आणि बिनेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी १० सप्टेंबर रोजी त्यांच्या घराजवळ एका प्रौढ अजगराची शिकार केली आणि त्याचे मांस प्रमोदच्या घरी शिजवले. गुप्त माहितीच्या आधारे तलिपरम्बा वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश पी आणि त्यांच्या पथकाने प्रमोदच्या घरावर छापा टाकला असता अजगराचे काही भाग शिजवल्याचे आढळले. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणात आरोपींची कसून चौकशी सुरू असून याआधीही त्यांनी अजगराची शिकार केली आहे का? याचाही तपास सुरू आहे.
अजगराची शिकार, तस्करी, विक्री, किंवा कोणतीही शारीरिक हानी पोहोचवणे हे भारतीय कायद्याने पूर्णपणे बेकायदेशीर आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ या अधिनियमाअंतर्गत अजगराची शिकार, हत्या, पकडणे, त्याचे अवयव विकणे कायद्याने गुन्हा आहे. या प्रकरणातील दोषींना ३ वर्षांपासून आजन्म कारावास, १० हजार रुपये किंवा त्याहून अधिक दंड आकारला जाऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये शिक्षा आणखी कठोर असू शकते.
भारतामध्ये मुख्यतः पायथन आणि रेटीक्युलिटेड या दोन प्रकारचे अजगर आढळतात. पायथन हा भारतातील मोठ्या सापांपैकी एक आहे, याची लांबी १० ते २० फूटपर्यंत असू शकते. पायथन अजगर मुख्यतः झाडीझुडपात आढळतो, जिथे तो आपल्या शिकारीसाठी लपतो. पायथन हा विषारी नसून उंदीर, पक्षी, आणि लहान लवले-सारख्या प्राण्यांची शिकार करतो. तर, रेटीक्युलिटेड अजगर हा जगातील सर्वात लांब साप म्हणून ओळखला जातो, याची लांबी ३० फूटापर्यंत असू शकते. दरम्यान, पश्चिम घाट, सह्याद्री पर्वत, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश, आणि उत्तर भारताच्या गारबी प्रदेशांमध्ये अजगर आढळतात.