राज्यातील दोन ‘भावी’ जिहादींना हैदराबादेत अटक
By Admin | Updated: October 24, 2014 03:35 IST2014-10-24T03:35:39+5:302014-10-24T03:35:39+5:30
कजण बंदी घातलेल्या ‘सिमी’ संघटनेचा कथित हस्तक आहे तर दुसरा इंडियन मुजाहिदीनच्या अटकेत असलेल्या मन्सूर पीरभॉयचा सहकारी आहे.

राज्यातील दोन ‘भावी’ जिहादींना हैदराबादेत अटक
हैदराबाद : भारतात दहशतवादी कारवायांसाठी अफगाणिस्तानात जाऊन ‘अल काईदा’कडून जिहादी प्रशिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातून आलेल्या शाह मुदस्सीर (२५ वर्षे) व शोएब अहमद खान (२४) या दोघांना सिकंदराबाद रेल्वे स्थानकात अटक करण्यात आली.
हैदराबाद पोलीस दलाच्या उत्तर परिमंडळाच्या उपायुक्त आर. जयलक्ष्मी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये ही माहिती देताना सांगितले की, यापैकी एकजण बंदी घातलेल्या ‘सिमी’ संघटनेचा कथित हस्तक आहे तर दुसरा इंडियन मुजाहिदीनच्या अटकेत असलेल्या मन्सूर पीरभॉयचा सहकारी आहे.
अबु आसीफ आणि कमरान शा हे पाकिस्तानी नागरिक, झाहीद अल हिंद हा अफगाणिस्तानचा नागरिक आणि मिर शौकत, समीर खान व मोहतासीम बिल्ला हे हैदराबादच्या साईदाबाद भागातील रहिवासी यांच्यासोबत भारतात दहशतवादी कारवायांचा कट रचल्याच्या आरोपांवरून या दोघांना अटक करण्यात आली आहे.
जयलक्ष्मी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुदस्सीर व शोएब फेसबूकच्या माध्यमातून हैदराबादमधील वादग्रस्त इस्लामी विद्वान इस्लाही यांचा मुलगा असलेल्या मोहतीशीम बिल्ला याच्या संपर्कात आले. इंटरनेटवरील सोशल नेटवर्क संकेतस्थळांच्या वापरात कुशल असलेले मुदस्सीर व शोएब अशाच प्रकारे पाकिस्तान व अफगामिस्तानच्या काही नागरिकांच्याही संपर्कात
आले.
फेसबुकवरून चॅट करताना अफगाणिस्तानचा झाहीद अली हिंदी व हैदराबादचा मोहताशीम बिल्ला हे दोघे मुदस्सीर व शोएब यांना जिहादी साहित्य वाचायला सांगून त्यांची डोकी भडकावीत असत. अशाच एका फेसबूक संभाषणात पाकिस्तानच्या कमरान शा याने स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असलेल्या रसायनांचा उपयोग करून स्फोटके कशी बनवता येतात, याची माहिती या दोघांंना उपलब्ध करून दिली. त्या संभाषणात या साहित्याचा उल्लेख ‘हैद्राबादी बिर्यानी’चे साहित्य असा केला गेला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार बिल्लाच्या बोलावण्यावरून मुदस्सीर व शोएब याआधी ३ सप्टेंबररोजी हैदराबाद येथे आले होते. त्यावेळी भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी अफगाणिस्तानला जाऊन अल-काईदाकडून प्रशिक्षण घेण्यासाठी बिल्लाने या दोघांना चिथावणी दिली.
व्हिसा मिळवून देतो व प्रवास खर्चाचीही व्यवस्था करतो, असे आश्वासन देऊन बिल्लाने त्यांना पुन्हा १० आॅक्टोबरला हैदराबादला बोलावले होते.
बुधवारी सिकंदराबाद रेल्वे स्थानकात संशयास्पद अवस्थेत फिरत असताना पोलिसांनी मुदस्सीर व शोएबला अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल फोन, स्फोटके कशी बनवावीत याची माहिती असलेले छापील साहित्य, पेन ड्राईव्ह व दहशतवादी प्रशिक्षणाच्या सीडी, पासपोर्ट व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. (वृत्तसंस्था)