एकाच गोळीने दोन गुंडांचा खात्मा
By Admin | Updated: November 8, 2015 02:06 IST2015-11-08T02:06:51+5:302015-11-08T02:06:51+5:30
बंदुकीच्या एकाच गोळीने प्रतिस्पर्धी गुंडांचा बळी घेतल्याची थरारक घटना पश्चिम दिल्लीत नुकतीच घडली. मनोज (२५) आणि दीपक (२४) अशी ठार झालेल्या गुंडांची नावे आहेत.

एकाच गोळीने दोन गुंडांचा खात्मा
नवी दिल्ली : बंदुकीच्या एकाच गोळीने प्रतिस्पर्धी गुंडांचा बळी घेतल्याची थरारक घटना पश्चिम दिल्लीत नुकतीच घडली. मनोज (२५) आणि दीपक (२४) अशी ठार झालेल्या गुंडांची नावे आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकने मनोजला मागच्या बाजूने मिठी मारून पकडून ठेवले होते व त्याच्या एका साथीदाराने गोळी झाडली. ती मनोजच्या छातीत शिरून दीपकच्या पोटात घुसली. यात दोघेही ठार झाले. विशेष म्हणजे, दोघांना यमसदनी पाठवणारी गोळी देशी बनावटीच्या बंदुकीतून झाडण्यात आली होती.
टिळकनगर येथील मनोजच्या घराजवळ ही घटना घडली. एकाच गोळीने दोघांना ठार करून दीपकचा साथीदार पळून गेला. तेथे राहणाऱ्या रहिवाशांनी पोलिसांना ही माहिती दिली. मनोज व दीपक यांना रुग्णालयात हलवले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दोघांचीही उत्तरीय तपासणी करण्यात आली.
मनोजवर दरोड्याचा गुन्हा दाखल होता व तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. दीपक हा आपल्या टोळीचा ताबा घेऊ इच्छित आहे, असे त्याच्या कानावर आले होते व तो त्याचा काटा काढण्याची संधी शोधत होता. दोघेही रात्रभर एकमेकांचा शोध घेत होते. बऱ्याच झटापटीनंतर अखेर दीपकने मनोजला धरले व साथीदाराला मनोजवर गोळी झाडण्यास सांगितले होते.
पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्यावरून गोळी झाडणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.