महापालिकेचे दोन लाचखोर जेरबंद
By Admin | Updated: August 26, 2015 00:18 IST2015-08-26T00:18:57+5:302015-08-26T00:18:57+5:30
१२ हजारांची लाच स्वीकारली : शाखा अभियंता आणि लिपीक गजाआड : एसीबीची कारवाई

महापालिकेचे दोन लाचखोर जेरबंद
१ हजारांची लाच स्वीकारली : शाखा अभियंता आणि लिपीक गजाआड : एसीबीची कारवाई नागपूर : नवीन फ्लॅट स्कीममध्ये महापालिकेचे नळाचे कनेक्शन देण्यासाठी १२ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या अभियंत्यासह दोघांच्या मंगळवारी एसीबीने मुसक्या बांधल्या. रमेश हिरामण कोहाड (वय ५०) आणि राहुल रमेश उंबरकर (वय २७) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही महापालिकेच्या नेहरूनगर झोन क्रमांक ५ मध्ये अनुक्रमे शाखा अभियंता तसेच ऑफिस बॉय म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार प्रशांत पंजाबराव सौदागर हे दहलीज बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स येथे नोकरीला आहेत. बिल्डरने आराधना नगर, दिघोरी येथे दोन सहनिवास प्रकल्प (फ्लॅट स्कीम) तयार केल्या आहेत. तेथेे पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन घेण्याकरिता नेहरू नगर झोन क्र. ५ मध्ये बिल्डरतर्फे रीतसर अर्ज करण्यात आला होता. २४ ऑगस्टला राहुल उंबरकरने सौदागर यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला. नळ कनेक्शनसाठी प्रत्येकी ७ या प्रमाणे एकूण १४ हजार रुपये द्यावे लागतील, तुम्ही कोहाड साहेबांशी बोलून घ्या, असे तो म्हणाला. बिल्डरला विचारून सांगतो, असे म्हणत सौदागरने सरळ एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांच्याकडे तक्रार नोंदविली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जैन यांनी सापळा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार, सौदागरने उंबरकर आणि कोहाडला लाच देण्याची तयारी दाखवून त्यांच्याशी सौदेबाजी केली. १४ ऐवजी १२ हजारात सौदा पक्का केल्यानंतर मंगळवारी दुपारी सौदागर कोहाडच्या कार्यालयात लाचेची रक्कम घेऊन गेले. त्यांच्याकडून लाच स्वीकारताच बाजूलाच दबा धरून बसलेले पोलीस उपअधीक्षक किसन पवार, पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे, हवालदार संजय ठाकूर, मिलिंद हलमारे, मनीष कावळे, प्रभाकर बल्ले, संतोष मिश्रा यांनी कोहाड आणि उंबरकरच्या मुसक्या बांधल्या. -- चार दिवसात चार गजाआडएसीबीने गेल्या चार दिवसात चार भ्रष्टाचाऱ्यांच्या मुसक्या बांधल्या आहेत. शनिवारी रात्री जरीपटक्याचे पोलीस कर्मचारी पाल आणि मिश्रा या दोघांना एका बुकीकडून अडीच लाखाची लाच उकळण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आज मंगळवारी त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली असतानाच इकडे एसीबीने कोहाड आणि उंबरकर यांना जेरबंद केले. या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कारवाईनंतर त्यांच्या घराचीही झडती घेण्यात आली. त्यात काय मिळाले. ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही. ---