गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या तणावाच्या परिस्थितीत अनेक जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. हे जवान आपल्या कर्तव्यावर परतत आहेत. यादरम्यान, माळवा एक्स्प्रेसमध्ये कर्तव्यावर परतणाऱ्या जवानांकडून लाच मागण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे. हे जवान जम्मू येथे कर्तव्यावर जात होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने संबंधित टीटीईला निलंबित केलं आहे.
याबाबत अधिक माहितीनुसार ग्वाल्हेर येथील सुभेदार विनोद कुमार दुबे यांनी याबाबत गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सांगितले क, माळवा एक्स्प्रेसमध्ये एका टीटीईने माझ्याकडून आणि माझ्यासोबत असलेल्या अग्निवीराकडून लाच घेतली. याबाबत ट्रेनमध्ये झालेल्या वादाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित टीटीई जवानाला व्हिडीओ बनवू नको म्हणून सांगत आहे. दरम्यान, जवान विनोद कुमार यांच्या एका परिचिताने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ रेल्वेपर्यंत पोहोचल्यावर रेल्वे खात्याने टीटीई दलजीत सिंग याला निलंबित केलं आहे. दलजीत सिंग हा लुधियाना विभागात तैनात होता.
ही घटना ९ मे रोजी सोनिपत आणि पानिपतदरम्यान घडली होती. याबाबत सुभेदार विनोद कुमार दुबे यांनी सांगितले की, मला ८ मे रोजी कर्तव्यावर हजर होण्यासाठी ग्वाल्हेर येथून जम्मू येथे जायचे होते. मी माळवा एक्स्प्रेसमधून जनरल वर्गाच्या तिकिटावर प्रवास सुरू केला. ९ मे रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ट्रेन जेव्हा सोनिपत आणि पानीपतच्या दरम्यान होती तेव्हा टीटीईने माझ्याकडे तिकीट मागितले. तेव्हा मी माझं जनरल वर्गाचं तिकीट आणि लष्करातील ओळखपत्र दाखवलं. तसेच मी जम्मू येथे कर्तव्यावर जात असल्याचंही सांगितलं. मात्र टीटीईने काहीही ऐकून न घेता मला दंड करण्याची कारवाई सुरू केली. तसेच जनरल डब्यात जाण्यास सांगितले.
विनोद कुमार दुबे यांनी पुढे सांगितले की, यादरम्यान, माझ्यासोबत प्रवास करत असलेला अग्निवीर जाहीर खान याच्याकडून टीटीईने १५० रुपयांची लाच घेतली. त्याने तिकीट देण्याऐवजी जनरल तिकीटावर काहीतरी लिहिलं. तसेच पावतीही बनवली नाही. मी २५ दिवसांची सुट्टी घेऊन आलो होतो. तसेच १२ मे रोजी परत जाणार होतो. मात्र सुट्टी रद्द झाल्याने मी ९ मे रोजीच माघारी परतलो होतो. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दलजीत सिंग या टीसीला निलंबित करण्यात आलं आहे. तसेच त्याची पुढील चौकशी सुरू आहे.