पर्रिकरांचा करिष्मा कायम ठेवण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: December 15, 2015 01:41 IST2015-12-15T01:41:28+5:302015-12-15T01:41:28+5:30
संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचा गोव्यातील राजकीय करिष्मा कायम ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न रविवारी भाजपाने त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त केलेल्या कार्यक्रमात केला.

पर्रिकरांचा करिष्मा कायम ठेवण्याचा प्रयत्न
- सद््गुरू पाटील, पणजी
संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचा गोव्यातील राजकीय करिष्मा कायम ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न रविवारी भाजपाने त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त केलेल्या कार्यक्रमात केला. भाजपाचा हा कार्यक्रम म्हणजे एक प्रकारचे शक्तिप्रदर्शनच होते.
पर्रिकर दिल्लीस गेले, तरी त्यांच्यापासून गोव्याला वेगळे करता येणार नाही, तसेच त्यांना बाजूला ठेवून गोवा भाजपा आगामी विधानसभा निवडणुकीस सामोरा जाऊ शकत नाही. त्यामुळे पर्रिकर यांच्या सत्कारानिमित्त पक्षाने शक्तिप्रदर्शन करत काँग्रेसचे मनोबल कमी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीपर्यंत पर्रिकर यांचा करिष्मा कायम ठेवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
भाजपाने पक्षाच्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघांत सर्वेक्षण केले होते. त्यातून लोकांचे सरकार व भाजपाचे मंत्री आणि आमदारांबाबत काय बोलतात, हे जाणून घेऊन, त्यावरील अहवालावर कोअर कमिटीमध्ये चर्चाही झाली. सर्वेक्षणातून काही मंत्री व आमदार अडचणीत असल्याची पक्षाला कल्पना आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याच नेतृत्वाखाली भाजपा विधानसभा निवडणुकीस सामोरा जाईल, पण पर्रिकर हेच गोवा भाजपाचे प्रचार प्रमुख असतील.
रविवारी कांपाल येथे झालेल्या सत्कार सोहळ््यावेळीही पर्रिकर यांनी जुवारी पुलाची निविदा दोन-तीन महिन्यांत येईल व काणकोणमधीलही पूल लवकरच होतील, हे सांगून टाकले. गोव्याला जे हवे ते केंद्राकडून करून घेऊ, हे त्यांनी पटवून दिले. पर्रिकर हे शुक्रवारपर्यंत अमेरिकेतच होते. गोव्यात पर्रिकर आणि पक्षाचे सतीश धोंड हे दोघेही नसताना दत्ता खोलकर, मुख्यमंत्री पार्सेकर, मंत्री दिलीप परुळेकर, सदानंद तानावडे आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला मोठी गर्दी जमविली होती.
२०१७च्या निवडणुकीत भाजपाला स्वीकारण्यासाठी त्यांना विश्वासार्ह चेहरा लागेल. ख्रिस्ती मतदारांतही स्थान असल्याने पर्रिकर यांनाच प्रचार प्रमुख म्हणून पुढे केले जाईल.