दिल्लीच्या ख्रिश्चन शाळेत तोडफोड
By Admin | Updated: February 14, 2015 00:44 IST2015-02-14T00:44:26+5:302015-02-14T00:44:26+5:30
दक्षिण दिल्लीच्या वसंत विहार भागात काही अज्ञात लोकांनी शुक्रवारी पहाटे येथील एका ख्रिश्चन शाळेवर कथितरीत्या हल्ला करून तोडफोड केली़

दिल्लीच्या ख्रिश्चन शाळेत तोडफोड
नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीच्या वसंत विहार भागात काही अज्ञात लोकांनी शुक्रवारी पहाटे येथील एका ख्रिश्चन शाळेवर कथितरीत्या हल्ला करून तोडफोड केली़ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेची गंभीर दखल घेत, दिल्ली पोलीस आयुक्तांना पाचारण केले़ या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले़ भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होली चाईल्ड आॅक्झिलियम स्कूलमध्ये ही घटना घडली़ अज्ञात हल्लेखोरांनी मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील वस्तूंची नासधूस केली, तसेच काही सीसीटीव्ही कॅमेरेही उद्ध्वस्त केले़ गेल्या नोव्हेंबरपासून राजधानी दिल्लीत ख्रिश्चन संस्थांवरील अशा प्रकारचा हा सहावा हल्ला आहे़ वाढती गुन्हेगारी, तोडफोडीच्या घटना, महिला सुरक्षेच्या मुद्यांवर काम करण्याचे निर्देश मोदींनी त्यांना दिले़ दरम्यान, होली चाईल्ड आॅक्झिलियम स्कूलच्या माजी विद्यार्थीनी असलेल्या मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी या हल्लयानंतर शाळेला भेट देऊन चौकशी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)