आगरतळा: विधानसभा निवडणुकीत डाव्यांवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर सोमवारी त्रिपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांचा विजयी उन्माद दिसून आला. या कार्यकर्त्यांनी काल दुपारी डाव्यांचा आदर्श असणारा कम्युनिस्ट नेता लेनिन याचा बेलोनिया शहराच्या मध्यवर्ती भागातील पुतळा बुलडोझरने पाडला. एवढेच नव्हे तर हा पुतळा पाडल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी त्याचे शीर वेगळे करून त्याला फुटबॉलसारखे लाथाडले. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यावेळी भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची 25 वर्षांची सत्ता उलथवून लावली. मात्र, या विजयाला 48 तास उलटत नाही तोच भाजपाच्या कार्यकर्त्यांचा विजयी उन्माद दिसून आला. 2013 मध्ये त्रिपुरात पुन्हा डाव्यांची सत्ता आल्यानंतर सरकारतर्फे बेलोनिया शहराच्या मध्यवर्ती भागात लेनिनचा पुतळा उभारण्यात आला होता. काल दुपारी 2.30 भाजपाचे काही कार्यकर्ते याठिकाणी जमले आणि त्यांनी बुलडोझरच्या सहाय्याने हा पुतळा पाडला. यावेळी त्यांच्याकडून 'भारत माता की जय' अशा घोषणाही देण्यात आल्या. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हा पुतळा खाली पाडल्यानंतर त्याचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले. त्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते लेनिनच्या शीराला बराचवेळ फुटबॉलसारखे लाथाडत होते. साहजिकच या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाली आहे. भाजपाला कम्युनिस्टांची प्रचंड भीती वाटत असल्यामुळे त्यांनी हे कृत्य केल्याची टीका मार्क्सवादी नेत्यांनी केली. तर हे कृत्य म्हणजे डाव्यांच्या दमनशाहीविरुद्ध असणारा लोकांचा रोष असल्याचे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. आमच्या पक्षाकडून कोणताही बुलडोझर भाड्याने घेण्यात आला नव्हता. हा परिसर डाव्यांच्या कट्टर विरोधकांचा आहे. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून प्रत्येक आठवड्याला याठिकाणी सभा आणि कार्यक्रम घेऊन विरोधकांवर आपली विचासरणी थोपवण्याचा प्रयत्न केला जाई. याच रागातून स्थानिक लोकांनी लेनीनचा पुतळा पाडला, असे भाजपा नेते राजू नाथ यांनी म्हटले. या घटनेनंतर बुलडोझरचा चालक आशिष पाल याला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, संध्याकाळी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. तसेच पालिकेकडून या पुतळ्याचे अवशेष ताब्यात घेण्यात आले आहेत. यावरून आता राष्ट्रीय पातळीवर भाजपा आणि डाव्यांमधील लढाई आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
उन्माद! विजयानंतर त्रिपुरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लेनिनचा पुतळा बुलडोझरने पाडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 08:55 IST