Triple Talaq: तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत झाले मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 03:21 AM2019-07-26T03:21:48+5:302019-07-26T09:58:29+5:30

३०२ खासदारांचा पाठिंबा : राज्यसभेकडे संमतीसाठी पाठविणार

Triple divorce bill passed in Lok Sabha | Triple Talaq: तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत झाले मंजूर

Triple Talaq: तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत झाले मंजूर

Next

नवी दिल्ली : मोदी सरकारने काही बदल करून तिसऱ्यांदा लोकसभेत मांडलेले तिहेरी तलाक विधेयक या सभागृहामध्ये गुरुवारी ३०२ खासदारांनी पाठिंबा दिल्याने मंजूर झाले, तर विरोधात ७८ मते पडली. हे विधेयक आता राज्यसभेकडे संमतीसाठी पाठविण्यात येईल. या विधेयकाला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांबरोबरच एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जनता दल (यू)नेही जोरदार विरोध केला. या विधेयकाच्या निषेधार्थ जनता दल (यू)च्या खासदारांनी सभात्यागही केला.

केंद्रीय विधीमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, तिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही तशी शेकडो प्रकरणे देशात पुन्हा घडली आहेत. मुस्लिम महिलांचे संरक्षण करण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी म्हणाले की, तिहेरी तलाक घेणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याच्या विधेयकातील तरतुदीला आमचा विरोध आहे. या प्रकरणी शिक्षा करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले कायदे पुरेसे आहेत. या विधेयकावर लोकसभेत मतदान घेण्याआधी मोदी सरकारचा निषेध करत तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला.

तिहेरी तलाकची प्रथा राज्यघटनाविरोधी असल्याचे सांगत यासंदर्भात कायदा संमत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले होते. त्यानुसार याआधी केंद्राने दोनदा हे विधेयक संसदेत मांडले होते. मात्र राज्यसभेत एनडीएला बहुमत नसल्याने तिथे हे विधेयक संमत होऊ शकले नाही. मोदी सरकारने मांडलेले तिहेरी तलाक विधेयक एकाच समाजाला लक्ष्य करणारे आहे अशी टीका काँग्रेसचे नेते व खासदार शशी थरूर यांनी लोकसभेत केली. सर्व धर्माच्या महिलांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने एक कायदा करावा असेही ते म्हणाले. तिहेरी तलाक विधेयकामुळे राज्यघटनेच्या १४ व १५व्या कलमाचे उल्लंघन होत असल्याची टीका एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

आझम खान यांचे आक्षेपार्ह उद्गार
या विधेयकावरील चर्चेच्या वेळी लोकसभेतील पीठासीन अधिकारी व भाजपच्या खासदार रमा देवी यांच्याविरोधात समाजवादी पक्षाच्या मोहम्मद आझम खान यांनी आक्षेपार्ह उद्गार काढल्यामुळे सभागृहात गदारोळ झाला. आझम खान यांनी माफी मागावी, अशी मागणी काही केंद्रीय मंत्र्यांनी केली.

Web Title: Triple divorce bill passed in Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.