तृणमूलचे कुणाल घोष यांचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: November 15, 2014 02:05 IST2014-11-15T02:05:32+5:302014-11-15T02:05:32+5:30
तृणमूलचे निलंबित खासदार आणि शारदा घोटाळ्यातील आरोपी कुणाल घोष यांनी शुक्रवारी प्रेसिडेन्सी सुधारगृहात झोपेच्या गोळ्या सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली.

तृणमूलचे कुणाल घोष यांचा आत्महत्येचा प्रयत्न
कोलकाता : तृणमूलचे निलंबित खासदार आणि शारदा घोटाळ्यातील आरोपी कुणाल घोष यांनी शुक्रवारी प्रेसिडेन्सी सुधारगृहात झोपेच्या गोळ्या सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. गेल्यावर्षी अटक झाल्यापासून त्यांना या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. त्यांना सरकारी एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
घोष यांनी भर न्यायालयात शारदा घोटाळ्यात सहभागी लोकांवर सीबीआयने कारवाई न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती सामान्य असल्याची माहिती दिली आहे, खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयातच ठेवल्याचे प. बंगालच्या सुधारगृह सेवामंत्री एच. ए. स्वाफी यांनी सांगितले. त्यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून पाळत ठेवली जात होती. ते झोपण्यापूर्वी आम्ही तपासणी केली होती. त्यांच्याकडे झोपेच्या गोळ्या किंवा अन्य अपायकारक पदार्थ आढळले नव्हते. शुक्रवारी पहाटे त्यांनी श्वास घेण्याला त्रस होत असल्याची तक्रार करतानाच झोपेच्या गोळ्या खाल्ल्याची कबुली दिली होती. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांची प्रकृती सामान्य आढळून आली. असे वरिष्ठ अधिका:याने सांगितले.
विरोधकांचा हल्लाबोल..
घोष यांनी खुल्या न्यायालयात आत्महत्येची धमकी दिली असताना राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना का केल्या नाहीत, असा सवाल करीत प. बंगालच्या विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. घोष यांनी मरण पत्करावे, असे सरकारला वाटत असावे, असा टोला प. बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी यांनी लगावला.
सीबीआय चौकशी करा
शारदा घोटाळ्यातील पुरावे नष्ट करण्याचा हा राजकीय कट आहे, घोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याची सीबीआयकडून चौकशी केली जावी, असे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सिद्धार्थनाथ सिंग यांनी म्हटले आहे. घोष हे मुख्य साक्षीदार असल्यामुळे त्यांच्यावर 24 तास निगराणी ठेवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
कर्मचारी निलंबित
प्रेसिडेन्सी सुधारगृहाचे कारागृह अधीक्षक, कारागृह डॉक्टर आणि तैनात कर्मचा:यांना चौकशी पूर्ण होईर्पयत निलंबित ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत केली. गृहसचिव वासुदेव बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील समिती या प्रकरणी चौकशी करील, असे त्यांनी स्पष्ट केले.