तृणमूल संसदेत सरकारला घेरणार
By Admin | Updated: December 14, 2014 01:30 IST2014-12-14T01:30:05+5:302014-12-14T01:30:05+5:30
पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री मदन मित्र यांच्या अटकेच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचे खासदार सोमवारपासून संसदेत आंदोलन करतील,

तृणमूल संसदेत सरकारला घेरणार
उद्यापासून आंदोलन : ममतांची भाजपा, केंद्रावर टीका
कोलकाता : पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री मदन मित्र यांच्या अटकेच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचे खासदार सोमवारपासून संसदेत आंदोलन करतील, असे जाहीर करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मित्रंच्या अटकेवरून भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला.
‘सीबीआयने आपली विश्वासार्हता गमावलेली आहे. सीबीआय राजकीय हत्यार बनली आहे. आता ही तपास संस्था गुंडाळण्याची वेळ आली आहे. भाजपाच्या या राजकीय सूडभावनेच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचे खासदार सोमवारपासून संसदेत आंदोलन पुकारणार आहेत’, असे बॅनर्जी म्हणाल्या. कोलकाता येथे शनिवारी तृणमूल काँग्रेसच्या रॅलीत त्या बोलत होत्या.
भाजपा आणि केंद्र सरकारने आपल्या मर्यादेत राहावे, असा इशारा देताना बॅनर्जी म्हणाल्या, ‘बंगालची जनता अपमान सहन करणार नाही. सत्तेत असल्यामुळे ते (भाजपा) मुजोर झाले आहेत. या रॅलीत मी मुख्यमंत्री म्हणून आले नाही तर एक नागरिक म्हणून आले आहे. मदन मित्र हे चोर वा डाकू आहेत, यावर माझा विश्वास नाही. त्यांचे कुटुंबीय श्रीमंत आहेत, याचा अर्थ त्यांनी शारदा चिटफंडमधून पैसा घेतला आहे, असे नव्हे.’
मित्र यांना दिल्लीतून फोन आल्यानंतरच सीबीआयने अटक केली.’ (वृत्तसंस्था)
मोदींच्या अटकेची मागणी करावी काय?
4शारदा समूहाचा अध्यक्ष सुदीप्ता सेन आणि मदन मित्र यांचे एका व्यासपीठावरील एकत्रित छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. त्याचा उल्लेख करून बॅनर्जी म्हणाल्या, ‘असे छायाचित्र जर गुन्हेगारी कटाचा पुरावा ठरत असेल तर सहारा घोटाळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अटक करण्यात आली पाहिजे.
4चिटफंड कंपनीच्या मालकांसोबत अनेक माकप नेत्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झालेली आहेत. सहारा प्रमुखासोबत मोदींचा फोटो आहे. मग सीबीआयने मोदींना अटक करावी, अशी मागणी आम्ही करायची काय?’
ममता बॅनर्जी घाबरल्या आहेत -भाजपा
4नवी दिल्ली : शारदा घोटाळ्याच्या संदर्भात करण्यात येत असलेली कारवाई ही राजकीय सूडाचा भाग असल्याचा आरोप केल्याबद्दल भाजपाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शारदा घोटाळ्यात ‘आपला सहभाग’ उघड होण्याची शक्यता असल्यामुळे ममता बॅनर्जी या कमालीच्या घाबरलेल्या आहेत, असे भाजपाने म्हटले आहे.