तृणमूल काँग्रेसला दुहेरी धक्का
By Admin | Updated: February 6, 2015 02:28 IST2015-02-06T02:28:09+5:302015-02-06T02:28:09+5:30
कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिट फंड घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीवर निगराणी ठेवण्याची पश्चिम बंगाल सरकारने केलेली विनंती सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली.

तृणमूल काँग्रेसला दुहेरी धक्का
नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिट फंड घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीवर निगराणी ठेवण्याची पश्चिम बंगाल सरकारने केलेली विनंती सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. सीबीआय आपल्या चौकशीत निष्काळजीपणा करीत असल्याचा कोणताही आरोप करण्यात आलेला नाही. त्यामुळे या चौकशीवर निगराणी ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
सध्या सुरू असलेल्या चौकशीबाबतची निवडक माहिती सीबीआयद्वारे मीडियाला पुरविण्यात येत असल्याचा राज्य सरकार आणि तृणमूल काँग्रेसने केलेला आरोपही सर्वोच्च न्यायालयाने खारीज केला. तथापि, सीबीआय चौकशीत अडथळे निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्याच्या कायदा मंत्र्याविरुद्ध अवमान खटला चालविण्याची विनंती मात्र सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
‘या दोघांविरुद्ध सीबीआयची कसलीही तक्रार नसल्याने त्यांच्याविरुद्धच्या दोन्ही याचिका दाखल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पीठाने स्पष्ट केले.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार श्रींजोय बोस यांनी तुरुंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सोबतच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)