संघ कार्यालयावर फडकावला तिरंगा

By Admin | Updated: February 23, 2016 01:29 IST2016-02-23T01:29:52+5:302016-02-23T01:29:52+5:30

मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जाऊन तेथे राष्ट्रध्वज फडकावला. काँग्रेसचे सुमारे ८00 कार्यकर्ते मोर्च्याने संघाच्या कार्यालयापाशी

Trigger tricolor at union office | संघ कार्यालयावर फडकावला तिरंगा

संघ कार्यालयावर फडकावला तिरंगा

इंदुर : मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जाऊन तेथे राष्ट्रध्वज फडकावला. काँग्रेसचे सुमारे ८00 कार्यकर्ते मोर्च्याने संघाच्या कार्यालयापाशी निघाले होते. त्यामुळे त्या परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना मध्येच अडवले. मात्र मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अरुण यादव यांच्यासह २0 कार्यकर्त्यांना संघाच्या कार्यालयात जाण्याची पोलिसांनी मुभा दिली.
संघाच्या कार्यालयात काँग्रेस कार्यकर्ते जाताच संघाच्या स्वयंसेवकांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना राष्ट्रध्वज लावू देण्यास आनंदाने परवानगीही दिली आणि राष्ट्रध्वज फडकावण्यास काँग्रेस कार्यकर्त्यांना मदतही केली. इतकेच नव्हे, तर त्यांना नाश्ता आणि चहाही दिला. रा. स्व. संघाच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अरुण यादव म्हणाले की, भाजप आणि संघाचे राष्ट्रप्रेम तोंडदेखले आहे. भाजप आणि संघाचे नेते राष्ट्रप्रेमाच्या मोठ्या बाता करतात, पण संघाच्या कार्यालयावर राष्ट्रध्वज मात्र लावत नाहीत. संघाचे नेते दिनेश जैन यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. आम्ही नेहमीच राष्ट्रध्वज फडकावतो आणि त्याला वंदनही करतो, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Trigger tricolor at union office