अल काईदाचे भारतीय दहशतवाद्यांना प्रशिक्षण
By Admin | Updated: November 7, 2014 04:19 IST2014-11-07T04:19:47+5:302014-11-07T04:19:47+5:30
इंडियन मुजाहिदीन व अल काईदा यांच्यातील एक गुप्त संभाषण, तसेच अटक केलेल्या दहशतवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही संघटना एकत्र येऊन काम करत

अल काईदाचे भारतीय दहशतवाद्यांना प्रशिक्षण
नवी दिल्ली : इंडियन मुजाहिदीन व अल काईदा यांच्यातील एक गुप्त संभाषण, तसेच अटक केलेल्या दहशतवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही संघटना एकत्र येऊन काम करत असून, अल काईदा मोठे घातपात घडवून आणण्याचे प्रशिक्षण इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना देत असल्याचे वृत्त आहे. यामुळे भारतीय गुप्तचर अधिकारी चिंतित आहेत. या संघटना भारतात मोठा हल्ला करण्याची तयारी करत आहेत.
अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली असून, त्यानुसार भारतातील परदेशी नागरिकांचे अपहरण करणे व भारताचे रूपांतर सिरीया व इराकमध्ये करणे अशा प्रकारचे कट केले जात आहेत. अल काईदा व इराकमधील इसिस संघटना भारतीय दहशतवाद्यांशी संपर्क कसा साधतात, या भेटी अफगाणिस्तानात कशा होतात,याकडे सध्या आमचे लक्ष आहे असे राष्ट्रीय तपास संघटना एनआयएचे प्रमुख शरदकुमार यांनी सांगितले. दहशतवाद्यांचे संघटन तसेच कारवाया वाढताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात वाघा सीमेवर पाकिस्तानात झालेला हल्ला आणि कोलकाता येथे दहशतवादी हल्ला होण्याचा देण्यात आलेला इशारा यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तसेच अल काईदा व इंडियन मुजाहिदीन यांच्यातील संघटनही वाढताना दिसत आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)