ट्रेन बॉम्बस्फोट : मुंबई एटीएसने मध्यप्रदेशातून एकाला केली अटक
By Admin | Updated: March 15, 2017 07:22 IST2017-03-15T07:22:11+5:302017-03-15T07:22:11+5:30
इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरुन आवेश शेख या तरुणाला मुंबई एटीएसने मध्यप्रदेश मधील खरगोनमधून अटक केली आहे

ट्रेन बॉम्बस्फोट : मुंबई एटीएसने मध्यप्रदेशातून एकाला केली अटक
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरुन आवेश शेख या तरुणाला मुंबई एटीएसने मध्यप्रदेश मधील खरगोनमधून अटक केली आहे. भोपाळ-उजैन ट्रेन स्फोटाच्या पार्श्वभूमीवर तपासामध्ये आवेशचा हात असल्याचा संशय मुंबई एटीएसला आहे. यासंदर्भात सध्या तपास सुरु आहे. सात मार्च रोजी भोपाळपासून 120 किलोमीटर अंतरावरील कालापीपल येथील जबडी रेल्वे स्टेशनजवळ भोपाळ-उज्जैन पॅसेंजर एक्सप्रेसमध्ये स्फोट झाला होता. यामध्ये दहा जण जखमी झाले होते.
इसिससोबत संबंध असलेले दहशतवादी देशात मोठा घातपात घडवण्याच्या प्रयत्नात होते. यासाठी त्यासाठी बरीच तयारीदेखील केली होती, अशीही माहिती समोर आली आहे. आठ मार्च रोजी टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भोपाळ-उज्जैन प्रवासी रेल्वेत करण्यात आलेला बॉम्बस्फोट ही घातपाताची एक झलक असल्याची धक्कादायक माहिती समोर होती. तर दुसरीकडे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही दहशतवाद्यांचा इस्लामिक स्टेटसोबत कनेक्शन असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. ट्रेनमध्ये पाईप बॉम्ब ठेवल्यानंतर दहशतवाद्यांनी त्याचे फोटो सीरियाला पाठवले, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.