लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सेवानिवृत्तीच्या दिवशी साधारणपणे कोणत्याही खटल्याच्या कामकाजात सहभागी होत नाहीत. मात्र, न्यायमूर्ती अभय ओक यांनी ही परंपरा बदलली आहे. शुक्रवारी त्यांचा कामकाजाचा शेवटचा दिवस होता. या दिवशी त्यांनी विविध खंडपीठांमध्ये सहभाग घेत ११ खटल्यांमध्ये न्यायदानाचे काम केले.
गुरुवारी त्यांच्या आईचे निधन झाले. आईच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्यासाठी ते गुरुवारी मुंबईला गेले आणि लगेच शुक्रवारी आपल्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसासाठी दिल्लीला परत आले. शनिवारी ते सेवानिवृत्त होत आहेत. मात्र, तो सुट्टीचा दिवस असल्यामुळे शुक्रवार हा त्यांचा कामकाजाचा शेवटचा दिवस होता.
‘सुप्रीम कोर्टापेक्षा हायकोर्ट अधिक लोकशाहीभिमूख’
सत्काराला उत्तर देताना न्या. ओक म्हणाले, सुप्रीम कोर्टापेक्षा हायकोर्टात अधिक लोकशाही मार्गाने काम होते. तेथे निर्णय प्रक्रिया विविध समित्यांद्वारे होते, तर सुप्रीम कोर्ट सरन्यायाधीश केंद्रीत आहे. ही कार्यपद्धती बदलण्याची आवश्यकता आहे.