पर्यटकांना ‘पोलिसी टोल’
By Admin | Updated: August 5, 2014 23:37 IST2014-08-05T21:40:40+5:302014-08-05T23:37:26+5:30
नाराजीचा सूर : सुरक्षिततेच्या नावाखाली केवळ त्रास

पर्यटकांना ‘पोलिसी टोल’
प्रसन्न राणे - सावंतवाड.. वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात टोल भरून आंबोली येथे जावे लागते. यामुळे याचा आर्थिक फटका पर्यटकांना बसत असल्याने पर्यटकांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे. पर्यटनाच्या वाढीच्या दृष्टीकोनातून पर्यटकांना होणारा त्रास कमी होण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
राज्यात जास्त पावसाचे आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून आंबोलीला ओळखले जाते. आंबोलीमध्ये पावसाळ्यात अनेक छोेटे मोठे धबधबे निर्माण होतात. दाट धुके असल्याने पर्यटक वाट काढत काढत आंबोलीत जाण्यायेण्याचा प्रवास करतात. वर्षभरातून पावसाळी हंगामामध्ये लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देऊन जात असतात. मात्र, या पर्यटकांना आंबोली पर्यटकांसाठी कोणतीच सुरक्षा या हंगामात नसते. याउलट तिठ्यातिठ्यांवर उभे राहून पोलीस या पर्यटकांकडून कागदपत्रांची मागणी करत बराच पैसा वसूल करतानाचे चित्र दिसून येत आहे.
बावळाट तिठ्यावर वाहतूक पोलीस व अन्य पोलिसांची बरीच गस्त असते. बावळाट तिठ्यावर गोव्याच्या दिशेने येणाऱ्या गाड्या या आंबोली हंगामात मोठ्या प्रमाणात असतात. याबरोबरच सावंतवाडीच्याही दिशेने येणाऱ्या काही गाड्या येत असतात. मात्र, यावेळी पोलीस जास्तीत जास्त वाहने अडवून सर्व कागदपत्रे तसेच अन्य गोष्टींची तपासणी करत असतात. मात्र, यावेळी कागदपत्रे असूनही कोणते ना कोणते कारण सांगून पैसा उकळण्याचे काम मोठ्या प्रमाणात याठिकाणी सुरू असते. पावसानेही यावर्षी जून महिना पूर्णपणे कोरडाच घालवून जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जोर धरला. यामुळे धबधबे सुरू होईपर्यंत पर्यटकांना दिवसही कमी मिळाले आहेत. यामुळे आंबोली येथील अनेक हॉटेल व्यावसायिकांचेही नुकसान झाले आहे.
आंबोली येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी बाचाबाची होत असते. हाणामारीचे प्रकारही घडतात. मात्र, अशावेळी कोणत्याही प्रकारचे पोलीस संरक्षण मिळत नाही. महिलांनाही छेडछाडीसारख्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. मद्यधुंद अवस्थेत काही पर्यटक महिलांची छेडछाड काढतात. आंबोली घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही होते. अशावेळी पोलीस नागरिकांच्या संरक्षणाच्या नावाखाली बावळाट तिठा, बोर्डी पूूल अशा ठिकाणांवर उभे राहून पर्यटकांकडून पैसे वसूल करत असतात. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. यावर योग्य तो निर्णय घेण्याची अपेक्षा पर्यटकांमधून व्यक्त केली जात आहे.