सरकारी निधीविना गावात शौचालये
By Admin | Updated: June 11, 2017 00:53 IST2017-06-11T00:53:25+5:302017-06-11T00:53:25+5:30
रमजान हा मुस्लिमांसाठी पवित्र महिना असतो. या काळात मुस्लीम उपवास करतात आणि त्याचबरोबर अनेक चांगली कामेही निष्ठेने करतात. उत्तर प्रदेशातील बिजनोरच्या

सरकारी निधीविना गावात शौचालये
बिजनोर : रमजान हा मुस्लिमांसाठी पवित्र महिना असतो. या काळात मुस्लीम उपवास करतात आणि त्याचबरोबर अनेक चांगली कामेही निष्ठेने करतात. उत्तर प्रदेशातील बिजनोरच्या मुबारकपूर कला या छोट्याशा गावातील मुस्लिमांनीही या काळात राज्य सरकारने दिलेली आर्थिक मदत नाकारून स्वखर्चाने शौचालये बांधली.
प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासारखे दुसरे कोणतेही काम मोठे आणि महत्त्वाचे असू शकत नाही, असे सांगत स्वखर्चाने शौचालये बांधताना, या गावातील मुस्लिमांनी राज्य सरकारकडून आलेली साडे सतरा लाख रुपयांची मदत न घेण्याचे ठरवले.
या गावाची वस्ती आहे सुमारे ३५00. गावात ६६१ कुटुंबे राहत असून, त्यापैकी १४६ जणांच्या घरांतच शौचालये होती. प्रत्येक गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गावाच्या सरपंचाला शौचालये बनवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याला सांगितले. त्यानुसार त्याने तो पाठवला आणि साडे सतरा लाख रुपयांचा निधी मंजूर होऊ न, तो गावाच्या खात्यात जमा झाला. पण गावकऱ्यांनी ते पैसे घ्यायला नकार दिला.
सरकारकडून मिळालेला निधी न घेता स्वखर्चाने संपूर्ण गावात शौचालये बांधणारे मुबारकपूर कला हे उत्तर प्रदेशातील पहिले गाव ठरले आहे, अशी माहिती मुख्य विकास अधिकाऱ्याने सांगितले. (वृत्तसंस्था)