शौचालय बांधकाम; निधीत वाढ होणार
By Admin | Updated: August 27, 2014 00:54 IST2014-08-27T00:54:24+5:302014-08-27T00:54:24+5:30
स्वच्छता सुविधा नसलेल्या ग्रामीण कुटुंबाला येत्या काळात शौचालय बांधकामासाठी १५ हजार रुपये मिळणार आहेत.

शौचालय बांधकाम; निधीत वाढ होणार
नवी दिल्ली : स्वच्छता सुविधा नसलेल्या ग्रामीण कुटुंबाला येत्या काळात शौचालय बांधकामासाठी १५ हजार रुपये मिळणार आहेत. शाळा व अंगणवाडी केंद्रातील शौचालय बांधकामासाठी अनुक्रमे ५४ हजार आणि २० हजार रुपयांचा वाढीव निधी मिळणार आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या ग्राम विकास मंत्र्यांच्या सूचनांच्या आधारांवर याबाबतचा प्र्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच तो केंद्रीय मंत्रिमंडळासमक्ष येणार आहे़
पेयजल आणि स्वच्छता मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी येथील कार्यक्रमात ही माहिती दिली़ व्यक्तिगत शौचालय बांधकामासाठीचा निधी १० हजार रुपयांवरून वाढवून १५ हजार रुपये करण्यात येणार असून शाळेतील शौचालय बांधकामासाठीचा निधी ३५ हजार रुपयांवरून वाढवून ५४ हजार रुपये केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली़ अंगणवाडी केंद्रातील शौचालय बांधकामासाठीचा निधीही ८ हजारांवरून २० हजार रुपये करण्यात येणार आहे़ याशिवाय सार्वजनिक शौचालय बांधकामासाठीचा दोन लाख रुपयांचा निधी वाढवून सहा लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे, असेही त्यांनी सांगितले़
(लोकमत न्यूज नेटवर्क)