करसेवकांवरील गोळीबाराच्या आदेशाचा सल आजही मनात - मुलायमसिंह यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2016 12:18 IST2016-01-25T11:22:04+5:302016-01-25T12:18:34+5:30
१९९० साली करसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिल्याबद्दल दु:ख असून तो सल आदही मनात आहे, असे मुलायम सिंग यादव यांनी म्हटले.

करसेवकांवरील गोळीबाराच्या आदेशाचा सल आजही मनात - मुलायमसिंह यादव
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २५ - समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी बाबरी मशिद घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून त्यावेळी करसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिल्याचे वाईट वाटते असे म्हटले आहे. मात्र धार्मिक स्थळाच्या रक्षणासाठी त्यावेळी गोळीबार करण्याची आवश्यकता होती, असेही ते म्हणाले.
लखनौ येथे समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. अयोध्येत १९९० साली करसेवकांवर करण्यात आलेल्या गोळीबारात १६ जण मृत्यूमुखी पडले होते, त्याविषयी मुलायमसिंह यांनी प्रथमच जाहीरपणे वक्तव्य केले.
'अयोध्येत करसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिल्याबद्दल मला दु:ख होते, तो सल अद्यापही माझ्या मनात आहे. पण तेव्हा मंदिर की मशीद याचा निवाडा करण्यापेक्षा एकता अबाधित राखण्याचे आव्हान राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्यासमोर होते. शांतता कायम राखण्यासाठीच मला गोळीबाराचे आदेश द्यावे लागले' असे मुलायमसिंह म्हणाले.
या कार्यक्रमादरम्यान मुलायमसिंह यांनी स्वपक्षीय मंत्र्यांनाही चांगलेच फटकारले. ' जर तुम्हाल (मंत्री) पैसाच कमवायचा असेल, तर राजकारणात येण्यापेक्षा एखादा व्यापार किंवा उद्योगधंदा सुरू करावा' असे ते म्हणाले.