नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७३वा वाढदिवस आहे. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त देशासह जगभरातील सर्व नेते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम; जागतिक नेत्यांच्या यादीत सर्वात अव्वल
राष्ट्रपती ट्विट करत म्हणाल्या की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी वाढदिवसानिमित्त तुमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. तुमची दूरगामी दृष्टी आणि कणखर नेतृत्वाने तुम्ही 'अमृत महोत्सव' मध्ये भारताच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा कराल अशी माझी इच्छा आहे. मी देवाला प्रार्थना करतो की तुम्ही नेहमी निरोगी आणि आनंदी राहा आणि तुमच्या अद्भूत नेतृत्वाने देशवासियांना लाभत राहो.
नरेंद्र मोदी आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नवी दिल्ली येथे 'यशोभूमी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (IICC)च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील. याशिवाय, ते द्वारका सेक्टर २१ ते द्वारका सेक्टर-२५ मधील नव्याने बांधलेल्या मेट्रो स्टेशनला जोडणाऱ्या दिल्ली विमानतळ मेट्रो एक्स्प्रेस लाइनचा विस्तार देशाला समर्पित करतील. नरेंद्र मोदींकडून 'पीएम-विश्वकर्मा' या केंद्रीय क्षेत्र योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. पारंपारिक कारागीर आणि हस्तकलेतील निपुण कारागिरांना ओळख आणि सर्वांगीण मदत करण्यात येणार आहे. या योजनेसाठी सरकार १३,००० कोटी रुपये खर्च करणार आहे ज्यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय नोडल मंत्रालय म्हणून काम करत आहे.
नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य मंत्रालय आयुष्मान भव कार्यक्रम सुरू करणार आहे. याव्यतिरिक्त, भाजपा एक 'सेवा पखवाडा' कार्यक्रम सुरू करेल ज्यामध्ये समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचणे आणि देशभरात विविध कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करणे समाविष्ट आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. त्रिपुरातील भाजपाने मोदींच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला 'नमो विकास उत्सव' असे नाव दिले आहे. दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात कुमारघाट पीडब्ल्यूडी मैदानावर आयोजित योग सत्राने होणार आहे. गुजरातमध्ये नवसारी जिल्ह्यातील ३०,००० शाळकरी मुलींसाठी बँक खाती उघडण्याची योजना आखत आहे. यानिमित्ताने गुजरातमधील सर्व जिल्ह्यांमध्ये भाजपा युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.