आजपासून देशभरात ‘स्वच्छ भारत मिशन’
By Admin | Updated: October 2, 2014 09:00 IST2014-10-02T02:27:18+5:302014-10-02T09:00:08+5:30
स्वच्छ भारत मिशन आजपासून सुरू होणार असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हातात झाडू घेऊन स्वच्छका करणार आहेत.

आजपासून देशभरात ‘स्वच्छ भारत मिशन’
मोदी करणार उद्घाटन : 31 लाख केंद्रीय कर्मचारी घेणार स्वच्छतेची शपथ
नवी दिल्ली : ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत देशभरात कार्यरत असलेले केंद्र सरकारचे 31 लाख कर्मचारी गुरुवारी गांधी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सार्वजनिक समारंभांमध्ये स्वच्छतेची शपथ घेणार आहेत. याशिवाय राज्य सरकारच्या लक्षावधी कर्मचा:यांनाही या स्वच्छ भारत मिशनमध्ये सहभागी होण्याचे आग्रही आवाहन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील राजपथावर या देशव्यापी ‘स्वच्छ भारत मिशन’चा शुभारंभ होणार आहे.
मोदी यांनी 2019 र्पयत महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी ‘स्वच्छ भारत मिशन’ ही लोकचळवळ बनविण्याचे आवाहन केले आहे. राजपथावरील कार्यक्रमात मोदींसह केंद्रीय मंत्रिमंडळातील जवळपास सर्वच सदस्य हातात झाडू घेऊन स्वच्छता करतील.
राष्ट्रपती भवनातील सर्व कर्मचारी मंगळवारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानात सामील होणार आहेत. हे कर्मचारी संपूर्ण राष्ट्रपती भवन परिसराची स्वच्छता करतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)