तंबाखू, सिगारेट पाकिटांवर इशारा दुप्पट मोठा

By Admin | Updated: September 30, 2015 00:56 IST2015-09-30T00:56:37+5:302015-09-30T00:56:51+5:30

बाजारात विकल्या जाणाऱ्या सिगारेट आणि तंबाखूच्या पाकिटावर येत्या १ एप्रिलपासून धोक्याचा चित्ररूपी व शब्दरूपी वैधानिक इशारा सध्याहून दुप्पट आकाराचा छापावा लागणार आहे.

Tobacco, double cigarette warning signs on cigarette | तंबाखू, सिगारेट पाकिटांवर इशारा दुप्पट मोठा

तंबाखू, सिगारेट पाकिटांवर इशारा दुप्पट मोठा

नवी दिल्ली : बाजारात विकल्या जाणाऱ्या सिगारेट आणि तंबाखूच्या पाकिटावर येत्या १ एप्रिलपासून धोक्याचा चित्ररूपी व शब्दरूपी वैधानिक इशारा सध्याहून दुप्पट आकाराचा छापावा लागणार आहे.
सध्या तंबाखू व सिगारेटच्या पाकिटांच्या दोन्ही बाजूंना ४० टक्के जागेवर तंबाखूपासून आरोग्यास होणाऱ्या अपायांचा धोका स्पष्ट करणारा वैधानिक इशारा छापावा लागतो. १ एप्रिलपासून पाकिटाच्या दोन्ही बाजूंची ८५ टक्के जागा अशा इशाऱ्यासाठी द्यावी लागेल. यापैकी ४० टक्के जागेवर तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होऊन पूर्णपणे सडलेले तोंड, गाल वा चेहरा यासारखे चित्र असेल. २० टक्के जागेवर ‘तंबाखूने कर्करोग होतो’, ‘तंबाखू प्राणघातक आहे’, ‘तंबाखू म्हणजे मृत्यूशी गाठ’ अशा प्रकारचा शाब्दिक इशारा इंग्रजी व हिंदी किंवा प्रादेशिक भाषेत छापावा लागेल. ‘सिगारेट्स अँड अदर टोबॅको प्रॉडक्ट्स (पॅकेजिंग अँड लेबलिंग) रुल्स, २००८’नुसार यासंबंधीची अधिसूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी रात्री जारी केली. हा नवा नियम १ एप्रिल २०१६पासून लागू करण्यात येणार असल्याचे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हे बंधन आयात केली जाणारी सिगारेटची पाकिटे व चघळून खाण्याच्या तंबाखूच्या पाकिटांनाही लागू असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
----------
राजस्थान उच्च न्यायालयाने रेटा लावल्याने केंद्राने घाईघाईत ही नवी अधिसूचना जारी केली. केंद्र सरकारने मोठ्या वैधानिक इशाऱ्याची अंमलबजावणी २९ सप्टेंबरपर्यंत करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजी दिले होते.

Web Title: Tobacco, double cigarette warning signs on cigarette

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.