'हे खूप दुर्दैवी आहे की अमेरिकेने भारतावर कामासाठी अतिरिक्त शुल्क लावण्याचा पर्याय निवडला, जे इतर देश त्यांच्या देशहितासाठी करत आहेत", अशा शब्दात भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफसह एकूण ५० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ टक्के अतिरिक्त टॅरिफच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. ट्रम्प यांनी फोडलेल्या टॅरिफ बॉम्बवर भारताने भूमिका मांडली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी म्हटले की, काही दिवसांपासून अमेरिका रशियातून तेल आयात करण्यावरून भारताला लक्ष्य करत आहे. आम्ही या मुद्द्यावर आमची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे.
जैस्वाल पुढे बोलताना म्हणाले की, भूमिका मांडता आम्ही आधीच स्पष्ट केले होते की, आमची तेल आयात बाजारावर आधारित आहे आणि याचा मुख्य उद्देश १४० कोटी भारतीयांना निश्चित आणि सुरळीत ऊर्जा पुरवठा करणे आहे.
अमेरिकेचा हा निर्णय दुर्दैवी
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते जैस्वाल म्हणाले की, "तरीही हे खूप दुर्दैवी आहे की, अमेरिकेने भारतावर त्या गोष्टींसाठी अतिरिक्त टॅरिफ लादला, ज्या गोष्टी इतर देश त्यांच्या राष्ट्रहितासाठी करत आहेत. आम्ही पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतोय की हे पाऊल अन्यायकारक, चुकीचे आणि अविवेकी आहे."
"भारत आपल्या राष्ट्रहिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना करेल", अशी भूमिका जैस्वाल यांनी ट्रम्प यांच्या निर्णयानंतर मांडली.