ट्विट भोवले, गायक अभिजीतवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
By Admin | Updated: May 8, 2015 16:57 IST2015-05-08T16:53:29+5:302015-05-08T16:57:12+5:30
सलमान खानच्या सुटकेवर वादग्रस्त ट्विट करणे गायक अभिजीत भट्टाचार्य व फराह अली खान यांना आता चांगलेच महागात पडले आहे.

ट्विट भोवले, गायक अभिजीतवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
ऑनलाइन लोकमत
मुझफ्फरपूर, दि. ८ - सलमान खानच्या सुटकेवर वादग्रस्त ट्विट करणे गायक अभिजीत भट्टाचार्य व फराह अली खान यांना आता चांगलेच महागात पडले आहे. तेढ पसरवणे, चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बिहारमधील कोर्टाने दिले आहेत.
अभिनेता सलमान खान याला हिट अँड रनप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यावर गायक अभिजीत यांनी सलमानच्या समर्थनार्थ वादग्रस्त व संताप आणणारे ट्विट केले होते. ‘कुत्रे रस्त्यावर झोपले तर ते मरणारच. रस्ते हे गरिबांच्या बापाचे नाहीत. माझ्याकडेही घर नव्हते, म्हणून मी कधी रस्त्यावर झोपलो नाही,’ असे त्याने म्हटले होते. तर सलमानची मैत्रिण फराह अली खानने देखील रस्त्यावर झोपणा--या गरिबांना सुविधा न देणारे सरकार जबाबदार असून सलमानचा यात काही दोष नाही असे तारे तोडले होते. या दोघांविरोधात बिहारमधील वकिल सुधीर ओझा यांनी मुझफ्फरनगरमधील कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीश रामचंद्र प्रसाद यांनी दोघांवर काझी मोहम्मदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.