Tirupati Temple Stampede: आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैकुंठ द्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 3-4 भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तिरुपती मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शन दहा दिवसांसाठी खुले करण्यात आले आहे. या दर्शनाचे तिकीट मिळवण्यासाठी हजारो भाविक विविध तिकीट केंद्रांवर सकाळपासून रांगा लावून उभे होते. यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली, ज्यात तीन-चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर तात्काळ तिरुपती पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. अजूनही हजारो भाविक दर्शनासाठी रांगा लावून आहेत.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला शोक या घटनेनंतर मंदिर समितीचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी परिस्थितीबाबत तातडीची बैठक घेतली आहे. तसेच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनाही याबाबत सविस्तर माहिती दिली. भाविकांचा मृत्यूबद्दल मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन योग्या त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
वैकुंठ दर्शन 10 ते 19 जानेवारी दरम्यान उघडलेमिळालेल्या माहितीनुसार, 10-19 जानेवारीदरम्यान वैकुंठ दर्शन सुरू होणार आहे. या कालावधीत लाखो भाविक दर्शनासाठी तिरुपती मंदिरात येतील. यासाठी तिरुपती मंदिर ट्रस्टने संपूर्ण तयारीही केली आहे. टीटीडीने गुरुवारपासून तिरुपतीमधील 9 केंद्रांमध्ये 94 काउंटरद्वारे वैकुंठ दर्शन टोकन देण्याची व्यवस्था केली आहे.