तिकिटांचा हिशेब मागितला

By Admin | Updated: June 18, 2014 04:38 IST2014-06-18T04:38:14+5:302014-06-18T04:38:14+5:30

अभिनेत्री प्रीती झिंटाच्या तक्रारीनुसार ज्या वेळी उद्योगपती नेस वाडिया यांनी अपमान केला,

Tickets for reckoning | तिकिटांचा हिशेब मागितला

तिकिटांचा हिशेब मागितला

मुंबई : अभिनेत्री प्रीती झिंटाच्या तक्रारीनुसार ज्या वेळी उद्योगपती नेस वाडिया यांनी अपमान केला, तेव्हा वानखेडे स्टेडियमच्या गरवारे स्टॅण्डमध्ये कोण कोण उपस्थित होते हे जाणण्यासाठी पोलिसांनी तिकिटांचा हिशोब मागितला आहे.
प्रीती सहमालकीण असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे चीफ आॅपरेशन आॅफिसर (सीओओ) फ्रेझर कॅस्टिलेनो, आयपीएलचे सीओओ सुंदर रमण यांना गरवारे स्टॅण्डमधील कॉर्पोरेट बॉक्समधली तिकिटे कोणाकोणाला दिली होती, ही माहिती देण्याची विनंती पोलिसांनी केल्याचे समजते.
घटना घडली (३० मे) तेव्हा पंजाब विरुद्ध चेन्नई असा सामना सुरू होता. कॉर्पोरेट बॉक्समधली तिकिटे ज्यांच्या हाती पडली आणि जे तेथे उपस्थित होते अशांकडे या घटनेबाबत चौकशी होऊ शकते, त्यापैकी काहींचे जबाब नोंदवून त्यांना साक्षीदारही केले जाऊ शकते, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. या घटनेची तक्रार रमण यांच्याकडे केल्याचा दावा प्रीतीने आपल्या तक्रारीत केला होता. तो खरा असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते. सामना संपल्यानंतर मैदानात प्रीतीने रमण यांच्याकडे वाडियांची तक्रार केली. तेव्हा रमण ‘कीप इट कूल, थिंक अबाऊट इट अ‍ॅण्ड देन डिसाइड’, असे प्रीतीला म्हणाले होते, असेही सूत्रांकडून समजते. रमण परदेशात असून ते मुंबईत आले की पोलीस त्यांचा जबाब नोंदविणार आहेत. रमण यांच्याआधी प्रीतीने वाडियांची तक्रार अध्यक्ष रंजीब जैस्वाल यांच्याकडे केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Tickets for reckoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.