धान, कापसावरुन राज्यसभेत गदारोळ
By Admin | Updated: December 2, 2014 00:05 IST2014-12-02T00:05:25+5:302014-12-02T00:05:25+5:30
धान आणि कापसाच्या सरकारी खरेदी मूल्यात मोठी कपात करण्यात आल्यावरून सोमवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला.

धान, कापसावरुन राज्यसभेत गदारोळ
नवी दिल्ली : धान आणि कापसाच्या सरकारी खरेदी मूल्यात मोठी कपात करण्यात आल्यावरून सोमवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या नेतृत्वात विरोधकांनी गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले.
सरकारने खरेदी मूल्यात कपात करून आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास बाध्य केल्याचा आरोप विरोधकांनी केला.
शेतमालाला लागत मूल्यापेक्षा ५० टक्के जादा किंमत मिळवून देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिले होते.
त्या आश्वासनाचे काय झाले. शेतकऱ्यांना मागील वर्षापेक्षाही कमी किमतीत आपला माल विकावा लागत आहे, यावर सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली आणि गोंधळाला सुरुवात झाली.
यावेळी उपसभापती पी. जे. कुरियन यांनी कामकाज आधी पाच मिनिटांसाठी तहकूब केले; परंतु हौद्यात गोळा झालेल्या विरोधी सदस्यांनी आपापल्या जागी न बसता गोंधळ सुरूच ठेवला. त्यामुळे कुरियन यांनी दुसऱ्यांदा दुपारपर्यंत कामकाज तहकूब केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)