थरारक..! १०४ उपग्रहासह अवकाशात झेपवलेल्या अग्निबाणाचा सेल्फी व्हिडिओ
By Admin | Updated: February 16, 2017 22:01 IST2017-02-16T21:53:40+5:302017-02-16T22:01:37+5:30
सध्याचा जमाना सेल्फीचा आहे. आपण कुठेही फिरायला गेलो की सेल्फी काढल्याशिवाय राहत नाही. मग, यामध्ये पीएसएलव्ही सी-37 हे यान तरी त्याला अपवाद कसं असेल?

थरारक..! १०४ उपग्रहासह अवकाशात झेपवलेल्या अग्निबाणाचा सेल्फी व्हिडिओ
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - सध्याचा जमाना सेल्फीचा आहे. आपण कुठेही फिरायला गेलो की सेल्फी काढल्याशिवाय राहत नाही. मग, यामध्ये पीएसएलव्ही सी-37 हे यान तरी त्याला अपवाद कसं असेल? ते तर जगावेगळी कामगिरी करण्यासाठी झेपावलं होतं. त्यामुळे सेल्फीचा मोह त्यालाही आवरला नाही.
सात देशांचे104 उपग्रह घेऊन भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं काल रचलेल्या विक्रमानं आपली सगळ्यांचीच मान अभिमानानं उंचावली आहे. या ऐतिहासिक विक्रमाचे रेकॉर्डिंग पीएसएलव्ही सी-37 ने केले असून त्याचा व्हिडिओ इस्रोनं प्रसिद्ध केला आहे. यानातून अवकाशात गेलेल्या 104 नॅनो उपग्रहांचं नेमकं झालं काय, हे पाहणं हा नक्कीच थरारक अनुभव आहे.
‘पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल’ (पीएसएलव्ही)-३७ या सिद्धहस्त अग्निबाणाच्या एकाच उड्डाणात तब्बल 104 उपग्रहांचे अंतराळात विविध कक्षांमध्ये एकाच वेळी यशस्वी प्रक्षेपण करून भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) बुधवारी नवे यशोशिखर गाठत भारताची मान आणखी ताठ केली. आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी वेळी ‘पीएसेलव्ही-37’ अग्निबाणाने या 104 उपग्रहांना कवेत घेऊन अचूक उड्डाण केले. द्रवरूप आणि घन इंधनांच्या चार इंजिनांच्या रेट्याने पुढील अवघ्या 17 मिनिटांत हा अग्निबाण अंतराळात 500 किमी उंचीवर पोहोचला. त्यानंतरच्या काही मिनिटांत अग्निबाणात विविध कप्प्यांमध्ये खुबीने ठेवलेल्या 104 उपग्रहांचे त्यांच्या पूर्वनिर्धारित कक्षांमध्ये एका पाठोपाठ एक अचूकतेने प्रक्षेपण करण्यात आले. ही कामगिरी फत्ते होताच, अंतराळ तळावरील नियंत्रण कक्षात बसलेल्या ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनी व तंत्रज्ञांनी हर्षोत्कट जल्लोश केला.