कसौली - हिमाचल प्रदेशच्या कसौलीतील गेस्ट हाउसचे अनधिकृत बांधकाम पाडण्यास गेलेल्या सरकारी महिला अधिका-याची गोळ्या घालून हत्या करणा-या गेस्ट हाउसचा मालक विजय ठाकूरला अटक केली आहे. त्याला उत्तर प्रदेशच्या मथुरा शहरात अटक करण्यात आली.महिला अधिकारी शैलबाला शर्मा लाच घेण्यास व बांधकाम पाडण्याचे थांबवण्यास तयार नसल्याने आपण त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचा जबाब त्याने पोलिसांना दिला आहे. गोळ्या झाडून तो फरार झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही महिला अधिकारी बांधकाम पाडण्यास गेली होती. त्यामुळे या हत्येची न्यायालयाने स्वत: दखल घेतली. तो गोळ्या झाडत असताना पोलीस पथक काय करीत होते, असा सवाल केला. त्यानंतर राज्य सरकारने पोलीस अधीक्षक, पोलीस ठाण्याचे प्रमुख यांच्यासह तीन अधिकाºयांना निलंबित केले आहे.आपण व आपली आई नारायणी दोघे शैलबाला यांना बांधकाम पाडू नका, असे सांगत होतो. त्यासाठी पैसे द्यायलाही तयार होतो. पण त्या ऐकतच नव्हत्या. त्यामुळे आपण संतापाच्या भरात त्यांना घाबरवण्यासाठी गोळ्या झाडल्या, असे ठाकूरने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
महिला अधिकाऱ्याची हत्या करणा-यास कोठडी, हिमाचल प्रदेशातील तीन अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 02:30 IST