दिल्लीतील गेल्या दोन वेळच्या विधानसभा निवडणुकीत ७० पैकी प्रत्येकी ६७ आणि ६२ जागा जिंकणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (आप) यावेळी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत आपला केवळ २२ जागाच मिळू शकल्या. तर भारतीय जनता पक्षाने तब्बल २७ वर्षांनंतर मोठा विजयसह दिल्लीत सत्तेवर आला. यातच आता आपच्या या पराभवासंदर्भात जन सूरजचे संस्थापक तथा निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर, यांनी मोठे भाष्य केले आहे. आपचा हा पराभव तीन चुकांमुळे झाला, यात तर एक चूक खुद्द अरविंद केजरीवाल यांची आहे, असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
एका मुलाखतीत बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, "गवर्नेन्स, आघाडी आणि अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यासंदर्भात झालेल्या चुकांमुळे आम आदमी पक्षाचा पराभव झाला. ते म्हणाले, आपच्या पराभवाचा विचार करता, 'तीन-चार गोष्टी दिसत आहेत, एक म्हणजे, गवर्नन्सचा आभावामुळे निर्माण झालेली अॅन्टी इनकंबन्सी होती. या बाबतीत शिक्षण क्षेत्र सोडल्यास, इतर कुठलीही नवी गोष्ट जनतेला दिसली नाही. गव्हर्नन्स बॅकफुटवर दिसले, प्रामुख्याने गेल्या मानसूनमध्ये ज्या पद्धतीने पाणी साचले होते. 'मोहल्ला क्लिनिक' उध्वस्त झाले होते. यमुना नदी संदर्भातील आश्वासन, प्रदुषणाची समस्या, एकूणच काय तर, लोकांच्या जीवनाशी थेट संबंध असलेल्या विषयांसंदर्भात कुठलाही सुधारणा दिसली नाही. याचा परिणामही झाला असेलच.'
प्रशांत किशोर पुढे म्हणाले, कधी 'इंडिया' आघाडीसोबत जाणे, कधी 'इंडिया' आघाडीतून दूर होणे, यामुळे त्यांचे दुहेरी नुकसान झाले. ते म्हणाले, 'पार्टी विथ डिफरन्स' टॅग घेऊन राजकारणात आलेला पक्ष हळू हळू कमकुवत झाला. त्यांचे I.N.D.I.A. मध्ये जाने, परत बाहेर पडणे, समजले नाही. आपण I.N.D.I.A. चा भाग आहात की नाही. लोकसभेत सोबत लढले. नंतर, विधानसभेत वेगळे झाले. यामुळे, एक जो मोठा वर्ग होता, जो म्हणत होता की, केंद्रात मोदी आणि खाली केजरीवाल तो आपल्या हातून निघून गेला. याशिवाय, आपण मोदींना हरवण्यासाठी I.N.D.I.A. सोबत रहावे असे ज्यांना वाटत होते, तेही आपल्यावर नाहाज झाले. असे आपचे दुहेरी नुकसान झाले.'
पीके पुढे म्हणाले, 'केजरीवाल यांची तिसरीचूक म्हणजे, जेव्हा केजरीवाल यांच्यावर दारू घोटाळ्याचा आरोप झाला, त्याच वेळी त्यांनी तुरुंगात जाण्यापूर्वी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा होता.' याचा त्यांना फायदा झाला असता. लोकांमध्ये सहानुभूती निर्माण झाली असती. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. यावेळी असा वर्गही नाराज झाला, ज्याला केजरीवाल हेच मुख्यमंत्री हवे होते. अर्थात, गव्हर्नन्स, राजकीय पोझिशन आणि राजीनामा, या तिनही गोष्टींमध्ये स्पष्टतेचा आभाव होता.'