एकट्याने फिरायला जायचा प्लॅन करून गमती-गमतीत तीन मुली ट्रेनमध्ये चढून प्रवासाला निघाल्याने कुटुंबीयांच्या तोंडचं पाणी पळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत एकमेकींसोबत कुठेतरी फिरायला जायचं ठरवून या मुली रेल्वेत बसून प्रवासाला निघाल्या होत्या. मात्र वाटेत पैसे संपल्याने घाबरून लखनौ स्टेशनवर उतरल्या. मात्र यादरम्यान, कुटुंबीयांनी पोलिसांना खबर दिल्याने वेळीच तपासाला सुरुवात होऊन या मुलींचा शोध घेण्यात यश मिळाले.
ही घटना उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील बांसडीह पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या केवरा गावात घडली असून, या कुटुंबातील आठ आणि नऊ वर्षांच्या दोन मुली फिरण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. या मुलींचे वडील पिंटू यांनी सांगितले की, त्यांच्या दोन मुली शाळेमध्ये गेल्या असताना मैत्रिणीसोबत त्यांचं काही बोलणं झालं. त्यावेळी त्यांनी कुठेतरी फिरायला जाण्याचं ठरवलं. त्यानंतर या मुली बलिया रेल्वे स्टेशनवर ट्रेनमध्ये बसल्या. ट्रेन पुढच्या प्रवासाला निघाल्यावर वाटेत या मुलींकडे असलेले पैसे संपले. त्यामुळे आता माघारी कसं फिरायचं, असा प्रश्न त्यांना पडला आणि त्या घाबरल्या.
दरम्यान, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास या मुली लखनौ रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या. अनोळख्या ठिकाणी आल्याने त्या गोंधळल्या. घाबरलेल्या स्थितीत त्या ट्रेनमधून उतरल्या. एकडे मुली अचानक गायब झाल्याने त्याचे आई-वडील आणि इतर नातेवाईकांच्या तोंडचे पाणी पळाले. खूप शोधाशोध केल्यानंतर अखेरीस त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवली आणि मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेरीस एका ऑटोवाल्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या मुलींना ताब्यात घेतले आणि कुटुंबीयांना त्या सापडल्याची माहिती दिली. घडल्या प्रकारामुळे या तिन्ही मुली खूप घाबरल्या होत्या, अखेरीस आई-वडिलांची भेट होताच त्या अगदी भावूक होऊन त्यांना बिलगल्या.
दरम्यान, या घटनेबाबत बांसडीहचे पोलीस ठाणे प्रमुख संजय सिंह यांनी सांगितले की, सीडब्ल्यूसीसमोर हजर केल्यानंतर या मुलींना नातेवाईकांकडे सुपुर्द करण्यात आलं आहे.